संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे. हजारो कोटींंच्या फटक्याने येथील संत्राउत्पादक गारद झाला. त्यांना उभारी देऊन गतवैभव उभारण्याचे आव्हान कृषिमंत्र्यासमोर आहे.वरूड तालुक्यात जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरवर संत्रा पीक आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची ही बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या अधिक आहे. तथापि, यंदा या पिकाच्या अंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटल्या, बोअर कोरडे पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ दोन ते पाच टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अतिशय तापमान आणि अतिशय पाणी उपशामुळे खालावलेली भूजलपातळी यामुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तालुका कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी सहायकांकडून संत्र्याखालील क्षेत्राच्या नुकसानाच्या घेणे सुरू केले आहे. या नोंदीनुसार आतापर्यंत तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा नष्ट झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे संत्रा झाडे व पर्यायाने येथील अर्थकारण जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे.शेतकऱ्यांना द्या पर्यायी पिकेसंत्राबागा जगविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यास शेतकऱ्यांना अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी आपल्या माणसांचे प्रबोधन ते नक्कीच करू शकतील. याशिवाय तालुक्यातील पाणीपातळी स्थिर राखण्यासाठीही त्यांना नागरिक, शेतकºयांना विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्या लागणार आहेत.अवैध बोअरला आळा घालासंत्राबागा जगविण्याच्या आमिषातून शेतकऱ्यांना बोअर करण्यास उद्युक्त करणाºया यंत्रणेवर जरब बसविण्याची अपेक्षा कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. ‘ड्राय झोन’मुळे तालुक्यात खोदली जाणारी प्रत्येक बोअर अवैध आहे. तरीही ती खोदण्यासाठी शासकीय ते खासगी अशा मालिकेतील प्रत्येक जणाकडे रक्कम पोहोचून जमिनीला भोके पाडली जात आहेत.भय संपलेले नाहीसध्याचा लांबलेला पावसाळा पाहता, दिवसागणिक संत्राझाडे सुकण्याच्या प्रकार सुरूच आहे. संत्राबागांचे नुकसान १० हजार हेक्टरपुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने अद्यापही येथे पाणीटंचाईचे भय संपलेले नाही. त्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकºयांचा जीव कासाविस झाला आहे. तब्बल २७ वर्षानंतर मतदारसंघाला मिळालेले कृषिमंत्रिपद संत्रा पट्ट्याला नवजीवन मिळवून देईल, अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांची आहे. यासंबंधी उपाययोजनांसंदर्भात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मंत्रालयातील बैठकीमुळे ते उपलब्ध झाले नाहीत.अतितापमानामुळे संत्राझाडे सुकायला लागली असून, ही प्रक्रिया दिवसागणिक सुरू आहे. आतापर्यंत ८ हजार ४०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा सुकल्या आहे. याबाबत कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू असून, शासनाला नियमित माहिती पाठविली जात आहे.- उज्ज्वल आगरकर,तालुका कृषी अधिकारी
८,४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:25 AM
राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे.
ठळक मुद्देसंत्राउत्पादक गारद, कोट्यवधीचे नुकसान : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वाचविण्याचे कृषिमंत्र्यांसमोर आव्हान; कृषी विभागाचा अहवाल