मोर्शी : अप्परवर्धा कालव्याच्या पुलावर नाल्याचे पाणी अडून १० वर्षांपासून पार्डी येथील प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेतातील पीक नष्ट होत आहे. अप्परवर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांने तीन वर्षांपूर्वी भाडे तत्त्वावर पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही. अप्परवर्धा कालव्याच्या पुलामुळे नाल्याचे पाणी अडल्यामुळे प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेत सर्वे नं ३२/१ मधील पीक पाण्याखाली येते. याप्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती व अर्ज त्यांनी केले. आमदारांनाही निववणी केली. २०१२ मध्ये अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता यांनी भाडे तत्त्वावर जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी दिली. मात्र जमीन उपलब्ध करुन दिली नाही. यावर्षी ११ आॅगस्ट रोजी पुराच्या पाण्याने सोलव यांचे शेतातील पीक वाहून गेले. पिकाकरिता सोलव यांनी बँकेकडून कर्जसुध्दा घेतले आहे. पुरात पीक वाहून गेल्यामुळे कर्ज परताव्याचा आणि प्रपंच चालविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सोलव यांनी आ.अनिल बोंडे यांना निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी पीक शंभरटक्के वाहून गेल्याचे कबूल केले. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.मागील दहा वर्षांपासून स्वत:च्या शेतातील पीक हाती येत नाही. नुकसान भरपाई मिळत नाही. शिवाय अधिकाऱ्यांनी लेखी कबुली दिल्यावरही पर्यायी जमीन भाडेतत्त्वावरही दिली जात नाही. या सर्व जाचापोटी दोन्ही शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसल्याची जाणीव अप्पर वर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदनाव्दारे सोलव बंधंनी करून दिली आहे. भविष्यात काही अप्रीय घटना घडल्यास त्याला अप्पर वर्धा प्रकल्पाचे अधिकारी आणि शासन जबाबदार राहील, असा इशारादेखील सोलव बंधूंनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कालव्याच्या पाण्यामुळे पार्डी येथील शेतकऱ्याचे नुकसान
By admin | Published: August 24, 2015 12:34 AM