जिल्हा परिषदेत पीआरसीचा निष्कर्ष : अनेकांवर कारवाईचे निर्देशअमरावती : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीने शनिवारी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे अक्षरक्ष: वाभाडे काढलेत. शालेय पोषण आहारावरून समिती सदस्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरत या योजनेतील अंदाधुंदी चव्हाट्यावर आणली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पंचायतराज समिती सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची बैठक झाली. शिक्षण विभागाच्या कामकाजाची तपासणी करीत असताना शालेय पोषण आहारातील अफरातफर भेटीदरम्यान उघड झाली. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या कुठल्याच नोंदी ठेवल्या नाहीत. याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांची साक्ष व दंड आकारण्यात आला. जि.प.च्या अनेक विभागात अनियमितता स्पष्ट दिसून आली. याप्रकरणी चौकशीचे निर्देश पीआरसीप्रमुख संभाजी निलंगेकर यांनी दिलेत. दोषी अधिकाऱ्यांना २५ हजार रूपयांप्रमाणे दंड ठोठावला. आतापर्यंत पीआरसीने केलेल्या दौऱ्यापैकी सर्वाधिक घोळ अमरावती जिल्हा परिषदेत दिसून आल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. यामध्ये शिक्षण, सिंचन, बांधकाम, समाज कल्याण, कृषी, आरोग्य, महिला बालकल्याण विभागात अनियमितता झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले. याची दखल घेत समितीने दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतन कपात, निलंबन कारवाईचा प्रस्ताव, दंडाची रक्कम वसूल करावी, जे अधिकारी दंडाची रक्कम भरणार नाही त्यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याची सूचना सीईओंना दिली. समितीत संभाजी निलंगेकर पाटील वसदस्य आ. प्रकाश भारसाकळे, समीर कुणावार, हेमंत पाटील, राजाभाऊ वाजे, भरतसेठ गोगावले, विकास कुंभारे, उन्मेष पाटील, कृष्णा गजबे, पांडूरंग फुंडकर, अमित झनक, रामहरी रूपनवर, राजेंद्र नरजधने यांचा समावेश आहे.
प्रभारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमुळेच घोळ
By admin | Published: November 08, 2015 12:19 AM