वाहतूक विस्कळीत : ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन, पौष रविवारी यात्रेला रंगत सुमित हरकुट चांदूरबाजारविदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा दुसऱ्या पौष रविवारी बहरली होती. सुटीचे औचित्य साधून ५० हजार भाविकांनी यात्रेत हजेरी लावली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेकांचे कुलदैवत असलेले बहिरमबाबांचे मंदिर सातपुड्याच्या कुशीत आहे. अनेक जण आपले नवस फेडण्याकरिता बहिरम यात्रेत येतात. यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असली तरीही खरी यात्रा ही पौष महिन्यातच भरते आणि त्यातही सुटीच्या दिवशी या यात्रेला अधिकच रंगत चढते. दरवर्षी यात्रेत आकाश पाळणे, टुरिंंग टॉकीज, नक्षीदार मातीच्या माठांची दुकाने, रेवड्या, फुटाण्यांसह खेळणी, कपडे तसेच अनेक गृहोपयोगी नाविण्यपूर्ण वस्तुंची दुकाने लागतात. यामुळे यात्रेत मोठी रेलचेल असते. येथील हंडीचे मटण प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही यात्रा सुटीच्या दिवशी अधिकच रंगून येते. पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी बहिरम यात्रेत रस्ते गर्दीने फुलले होते. जवळजवळ ५० हजारांवर भाविक बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता यात्रेत आले होते. परिसरात सगळीकडे चार चाकी वाहनांची गर्दी होती. मंदिराचा रस्ता चार चाकींनी व्यापून गेला होता. मंदिरापर्यंत चारचाकी नेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याऐवजी मंदिर प्रशासनाने पायी चालू न शकणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल गाडीची सुविधा केली होती. वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवसेंदिवस यात्रेला रंगत चढू लागली आहे. पोलीस प्रशासन यात्रेतील गर्दी पांगविण्याकरिता प्रयत्नशिल आहेत.
भाविकांच्या गर्दीने फुलली बहिरम यात्रा
By admin | Published: January 20, 2016 12:34 AM