विभागीय आयुक्तांची माहिती : कायदेशीर कारवाईचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात अमरावती : ‘तपोवन’ बालगृहाच्या अजय लहाने यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना हयगय केली. तपोवनात झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यानेच त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली आहे. दरम्यान, लहाने यांना या प्रकरणात सहआरोपी करायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय त्यांनी पोलिसांच्या कोर्टात टाकला आहे. तपोवनच्या संचालकपदाची जबाबदारी अजय लहाने यांनी तब्बल पाच वर्षे सांभाळली. दरम्यान, बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाचा घृणास्पद प्रकार उघड झाल्यावर संस्थेमधील काही पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संस्था चालकांनी हा प्रकार दडपण्याची चूक केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, मुलींच्या संगोपनाची जबाबदारी जेवढी संस्था चालकांची होती, त्यापेक्षा अधिक संचालकांची असल्याने मंगळवारी विभागीय आयुक्तांनी अजय लहानेंचा पदभार काढण्याचे आदेश दिले. ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश‘तपोवन’च्या बालगृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात ‘लोकमत’ने मोहीम उघडली होती. ‘लहानेंना अभय का?’ या मथळ्याखाली ३१ डिसेंबर २०१४ च्या अंकात वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा ‘लोकमत’ने केल्यानंतर अजय लहानेवर कारवाई करण्यात आली.
कर्तव्यात कसूर केल्यानेच लहानेंची उचलबांगडी
By admin | Published: January 17, 2015 10:49 PM