लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात फूट व नियमित पाऊस नसल्यामुळे फळाची वाढ झाली नाही तर झाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क हिरवी फळे तोडून फेकावी लागत आहे.दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होत असल्यामुळे संत्राबागा वाचविणे कठीण होत आहे. मोर्शी तालुक्यात ११ हजार हेक्टरवर संत्राझाडे असून, यापैकी साडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम असल्याचे तालुका कृषी अधिकारी योगेश संगेकर यांनी सांगितले. उर्वरित एक ते पाच वर्षाची झाडे आहेत. यापूर्वी अपुरा पाऊस झाल्याने व फळधारणा टिकून राहण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. किंबहुना अनेक बगीचात पोषक वातावरणाअभावी मृग बहर आला नाही.सद्यस्थितीत सिंचनाची स्थिती बिकट आहे. शेतकरी झाडे वाचविण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. विहिरीचे पाणी पुरत नाही. मोर्शी तालुका ड्राय झोन असल्यामुळे कूपनलिका करता येत नाही. अशा स्थितीत आडोशाला जाऊन कूपनलिका शेतकरी करीत आहेत. यामुळे विहिरीचीही पाण्याची पातळी खाली जात असल्याचे दिसून येत आहे. आसोना येथील शेतकरी दिनेश टिपरे यांना यावर्षी पोषक वातावरणाअभावी मृग बहर घेता आला नाही; उलट झाडे टिकून रहावी म्हणून खर्च होत आहे.संत्रा उत्पादक शेतकरी सधन म्हणून ओळख होती; परंतु अस्मानी सुलतानी संकटामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणून तो झाडे वाचविण्यासाठी हिरवी फळे तोडून फेकण्याची कसरत करीत आहे.
अपुऱ्या पावसामुळे संत्राबागा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:39 AM
खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे.
ठळक मुद्देसाडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम : हिरव्या फळांची तोड