जितेंद्र दखने लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गाव तिथे स्मशानभूमीची संकल्पना राबिवली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.
सर्वाधिक अडचण पावसाळयाच्या दिवसांत येते. मृताचा अंत्यविधी पार पडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून निधीदेखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होऊ नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांना असते. मात्र, जिल्हाभरातील १९९७ गावांपैकी १०० हून अधिक गावांत आजही स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी नदी-नाल्ल्याकाठी सोपस्कार पूर्ण करावा लागतो. मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे बोलते जात आहे.
जनसुविधेतून विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत १४ तालुक्यांतील मागील काही वर्षांत ५०० हून अधिक गावात स्मशानभूमीमध्ये दहन, दफनभूमी, चबुतऱ्यांचे बांधकाम, पाण्याची सोय, शेडचे बांधकाम, पोचरस्ता, स्मृती उद्यान व अन्य मूलभूत सुविधा, साैंदर्यीकरणाची कामे करण्यात आली आहेत. दरवर्षी स्मशानभूमीची कामे करण्यासाठी जनसुविधा योजनेसाठी चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. यामधून जिल्हाभरात कामे करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर यांनी सांगितले.
सावरपाणी गावात जंगलात अंत्यविधी चिखलदरा तालुक्यातील सावरपाणी या आदिवासीबहुल मूळ गावांच्या पुनर्वसनानंतर त्यापूर्वीही या गावात मृतांच्या अंत्यविधीसाठी अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी बांधव आजही जंगलात मांडवदेव म्हूणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या जागेत अंत्यविधीचा कायर्क्रम पार पाडतात. विशेष म्हणजे स्मशानभूमीत सुविधा तर सोडाच, पायी जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळाचे दिवसात तर परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
एकलारा स्मशानभूमीची वानवाअंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कोकर्डा परिसरातील एकलारा या गावातही स्मशानभूमी नसल्याने येथील गावकऱ्यांना भुलेश्वरी नदीकाठी मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावे लागतात. विशेष म्हणजे पावसाळयाच्या दिवसांत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. याशिवाय याच परिसरातील चार ते पाच गावांतही स्मशानभूमी नसल्याने अशा गावांत स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा निर्माण करून देण्याची मागणी होत आहे.