परतवाडा : कापसाअभावी अचलपूर येथील फिनले मिल व्यवस्थापनाने बंद केली आहे. कापसासह कच्चा माल उपलब्ध होत नसल्यामुळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत प्राप्त निर्देशानुसार मिल बंद ठेवण्यात येत असल्याचे मिल प्रबंधकांनी एका सूचनेद्वारे जाहीर केले.
मिलमधील स्पिनिंग व वाइंडिंग विभागातील आणि मिल कार्यालयातील दैनंदिन कामकाज २४ एप्रिलपासून पूर्णपणे बंद राहणार असल्याचे या सूचनेत नमूद आहे. कापसासह कच्चा माल उपलब्ध होत नसल्यामुळे मिलमधील सर्व विभाग व त्यातील मशीनरी बंद होत असल्याचे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. कच्च्या मालासह कापूस उपलब्ध होताच मिलमधील स्पिनिंग व वाइंडिंग विभागासह कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरू केले जाणार असल्याचेही या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. विभागप्रमुखांच्या निर्देशानुसार मिलच्या आवश्यकतेनुसार अतिआवश्यक सेवा अंतर्गत कायम व बदली कामगारांना आपल्या कामावर उपस्थित राहण्यासही या सूचनेत जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, २४ एप्रिलला पहिल्या पाळीतील मिल कामगार सकाळी ७ वाजता आपल्या कामावर हजर होण्याकरिता मिलच्या गेटसमोर उपस्थित झाले तेव्हा त्यांना गेटमधून मिलमध्ये प्रवेश नाकारला गेला. या कामगारांना गेटवर लावण्यात आलेली जाहीर सूचना दाखवून मिल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले. तेव्हा उपस्थित सर्व कामगारांनी गेटवरच ठिय्या दिला व याबाबत मिल प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
कामगारांचा रोष बघता, मिल प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले. गिरणी कामगार संघाचे अभय माथने व पदाधिकारी मिलच्या गेटवर हजर झाले. पोलिसांच्या उपस्थिती या पदाधिकाऱ्यांनी लेबर ऑफिसरसोबत चर्चा केली. मिल सुरू करण्याची मागणी रेटली. पण, यातून मार्ग निघू शकला नाही. कोरोनाकाळात दुसऱ्यांदा ही फिनले मिल प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. मार्च २०२० मधील लॉकडाऊनदरम्यान ही मिल यापूर्वी बंद करण्यात आली होती. बंद मिल सुरू व्हावी आणि कामगारांना पूर्ण वेतन मिळावे, याकरिता तीन महिने २१ दिवस मिलच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. अखेर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या २४ डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये फिनले मिल सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात किरकोळ कामकाज सुरू करण्याचे आणि तिसऱ्या आठवड्यापासून मिलचे सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले होते. यानंतर ही मिल सुरू केली गेली. कापसापासून धागा निर्मितीचे काम कालपर्यंत सुरू होते. कापसासह कच्चा माल आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करीत २४ एप्रिलपासून परत ही मिल बंद केली गेली.