मोहन राऊतअमरावती : परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर माहेरच्या नावाचा पुरावा नसल्याने तब्बल १० महिला परीक्षार्थिंना परीक्षेला प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी एका परीक्षा केंद्रावर घडला. त्यामुळे महिला परीक्षार्थिंना परीक्षा न देताच परत जावे लागले़राज्यात वखार महामंडळाच्यावतीने असिस्टंट या पदासाठी अमरावती येथे दुपारी ४ ते ६ आॅन लाईन पेपर परीक्षा केंद्रावर घेण्यात आला़ अमरावती शहरातील सिटी लॅन्ड येथे परीक्षाकेंद्र होते़ या केंद्रावर १० महिला परीक्षार्थी पेपर सोडविण्यास गेल्या असता त्यांना ओळखपत्र मागण्यात आले़ विवाह होऊन अनेक वर्षे झाल्याने संबंधित महिलांनी सासरच्या आडनावाचे आधार कार्ड दाखविले; मात्र केंद्रप्रमुखांनी हा पुरावा नाकारला. मागील अनेक दिवसांपासून परीक्षेची तयारी केली असताना ओळखपत्रावर सासरच्या नावाची स्वाक्षरी असूनही केंद्रप्रमुखाने त्या महिलांना परीक्षेपासून वंचित ठेवले. यामुळे या महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केली आहे़वखार महामंडलाच्या असिस्टंट या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी वर्धा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातून गरीब महिला आल्या होत्या. त्यांनी उपलब्धतेनुसार कागदपत्रे सोबत आणली खरी; मात्र परीक्षा केंद्रप्रमुखांना याहीपेक्षा अतिरिक्त कागदपत्र हवे असतील याची कल्पनादेखील नव्हती. त्या महिला थेट परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्यांना माहेरचे ओळखपत्र मागण्यात आल्याने त्या दाखवू शकल्या नाहीत. त्यामुळे या क्षुल्लक कारणावरून तसेच परीक्षा मार्गदर्शक सूचनेत अशी कोणतीच अट नसताना परीक्षेला बसू न दिल्यामुळे या महिलांनी प्रशासनाविरूद्ध असंतोष व्यक्त केला़ शासनाने आमच्या तक्रारीची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, अशी कैफीयत शासनाकडे तक्रारीद्वारे मांडली आहे़
माहेरचा पुरावा नसल्याने महिला परीक्षार्थींना नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 9:52 PM