चांदूर रेल्वे : २२ वर्षांनंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. शहरात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुन्हा तीन टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तिक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. स्थानिक नगर परिषदेच्या हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी पाणीटंचाईविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.चांदूर रेल्वे शहराला पाणी पुरविणाऱ्या मालखेड तलावात केवळ मृत साठा उपलब्ध असून, तलाव पूर्णत: कोरडा पडला आहे. यामुळे चांदूर रेल्वे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याविषयी नगर परिषद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आ. वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, पाणीपुरवठा सभापती महेश कलावटे उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. जगताप म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांनी तलावातील पाणी शहरासाठी पुरेसे असल्याचे सांगितले. शहराची लोकसंख्या ३५ हजार झाली आहे व जनावारांसाठीसुद्धा पाणी आवश्यक आहे, हे समजावून सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी पाच हजार लिटरचे पाच टँकर देण्यास तयार झाले. प्रत्येक टँकरला दिवसा दोन हजारांचा खर्च असला तरी ११०० रुपयेच प्रशासन अदा करू शकणार होते. नगर परिषदेला हे शक्य नसल्याने ही उर्वरित मदत वैयक्तिकरीत्या देणार असल्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितले. नगर परिषदेच्या मालकीचे दोन टँकर नावीन्यपूर्ण योजनेतून मिळविले. शहराला पुन्हा तीन टँकरची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. आर्थिक मदत दिली असल्याने टँकरवर बॅनर लावले; ते चुकीचे नसल्याचेही जगताप यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सतपाल वरठे, प्रफुल्ल कोकाटे, कल्पना लांजेवार, शारदा मेश्राम, शुभांगी वानरे, स्वाती माकोडे, शबाना परवीन हमीद कुरैशी, बंटी माकोडे, अविनाश वानरे, राजू लांजेवार, प्रवण भेंडे, शेख अंबीर, रूपेश पुडके, संदीप शेंडे, दीक्षांत पाटील, सुमेध सरदार उपस्थित होते.
नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणीटंचाईत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:36 AM
२२ वर्षांनंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. शहरात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुन्हा तीन टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तिक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : चांदूर रेल्वे नगर परिषदेत माध्यमांशी संवाद