लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनमध्ये मेळघाटात पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. वाघ, अस्वल, बायसन, सांबर, पक्षी, फुलपाखर, गरूड, नीळकंठ पक्षी, निलगाय, हरिण एवढेच नव्हे, तर कोब्राही ट्रॅप कॅमेरात लॉक झाला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, हरिसाल, कोलकाज, चिखलदरा, आमझरी, शहानूर, धारगड, अंबाबरवा, वान, नरनाळा, ढाकणा, चौरकुंड, हतरू, तारूबांदा, रायपूर ही पर्यटनक्षेत्रे आहेत. यातील काही भागांत गावकऱ्यांसह वाहनांची वर्दळ, ये-जा तर निश्चित पर्यटन क्षेत्रात (मार्गावर) पर्यटकांना घेऊन फिरणाऱ्या जिप्सी यामुळे वन्यजिवांचा मुक्तसंचार मंदावला होता.दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. गावकऱ्यांना जंगलबंदी करण्यात आली आहे. कुणालाही प्रवेश नाही. वाहनांची वर्दळ नाही. यात जंगलात सर्वत्र नीरव शांतता पसरली आहे. केवळ वन्यजिवांना हे रान मोकळे आहे.चिखलदरा पर्यटन क्षेत्रासह चिखलदरा, ढाकणा, गाविलगड, धारगड, शहानूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीव रस्त्यांवर येत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर भैलूमे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गाविलगड वनपरिक्षेत्रात तर कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघीण आपल्या दोन बछड्यांसह कैद झाली आहे.वन्यजिवांची संख्या वाढीवरवन्यजिवांचे संवर्धन व रक्षण करतानाच वनकर्मचारी जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावरील पाण्यावर लक्ष ठेवून आहे. या कृत्रिम पाणवठ्यात ते क्षेत्रीय कर्मचारी पाणी भरून ठेवत आहेत. भर उन्हाळ्यातही वन्यजिवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. नैसर्गिक पाणवठ्याच्या स्वच्छतेकडे व त्यातील पाण्याच्या स्वच्छतेकडे वन कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. यात वन्यजिवांची संख्या वाढली असून, त्यांचे दर्शन होत आहे.कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यापासून तर आगीपासून जंगलात संरक्षण करण्यापर्यंतची उपाययोजना क्षेत्रीय कर्मचारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात करण्यात येत आहे
लॉकडाऊनमध्ये मेळघाटात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 6:35 PM
लॉकडाऊनमध्ये मेळघाटात पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. वाघ, अस्वल, बायसन, सांबर, पक्षी, फुलपाखर, गरूड, नीळकंठ पक्षी, निलगाय, हरिण एवढेच नव्हे, तर कोब्राही ट्रॅप कॅमेरात लॉक झाला आहे.
ठळक मुद्देकोबराही कॅमेऱ्यात लॉकडाऊन