अमरावती : यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिके बाधित झाल्याचा संयुक्त सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला. मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याविषयी सकारात्मकता दाखविल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीमागे नापिकीचे सत्र सुरूच आहे. मागील खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने उद्ध्वस्त झाला. त्यानंतरचा रबी हंगाम अवकाळी पाऊस, गारपीट व परतीच्या पावसाने बाधित झाला. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी माघारला. पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याने शासनाने टंचाई घोषित केली. खरीप बाधित झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आशा रबी पिकावर होती. मात्र २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४९६ गावांमधील १५ हजार ३५३ शेतकऱ्यांचे ४२ हजार ७६६ हेक्टर मधील पिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६१२१ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झाले. फळपिकात ९८२६ हेक्टरमध्ये अंशत: व १४ हेक्टरमध्ये ५० टक्क््यांवर नुकसान झाले. इतर पिकांचे १२४७ हेक्टरमध्ये अंशत: ९१ हेक्टरमध्ये पूर्णत: बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान गहू व हरभरा पिकाचे झाले आहे. शासनाला वादळामुळे बाधित क्षेत्राचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडूनही २ हजार कोटींची मदत मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.
अवकाळीने ४९ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान
By admin | Published: March 27, 2015 12:00 AM