लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनापासून मुक्ती मिळवणे याला आज सर्वात मोठे प्राधान्य आहे. लोकसहकार्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळविता आले आहे. तरीही सावधगिरी हा सर्वात मोठा उपाय आहे. नवीन वर्षाच्या अनेक संकल्पना असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पाटबंधारे प्रकल्पांना गती देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करावयाचे आहे. वाढत्या आरोग्य सुविधांव्यतिरिक्त रोजगाराच्या क्षेत्रातही प्रत्येक पर्यायांवर काम केले पाहिजे. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कोणतीही उणीव सोडली जाणार नाही. चिखलदरा येथे स्कायवॉक, ब्रम्हसती डैम सहित सिडको चे प्रकल्प गतिमान करायचे आहे. छत्रीतालाव येथे मेट्रो टुरिझम, नांदगाव पेठ येथे बोर नदी प्रकल्प, मोझरी येथे सायन्स पार्क, तिवसाला वनोद्यान साकारला जात आहे. मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय प्रबोधिनी, संपूर्ण जिल्ह्यात नवीन शासकीय इमारती, न्यू कलेक्ट्रेट, जिल्हा परिषदेचे नवीन भवन, एसडीओ कार्यालयासहित सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणून नागरिकांना सोई उपलब्ध करण्याची योजना प्रस्तावित आहे. शिक्षण क्षेत्रातदेखील लक्ष दिले जात आहे. २० वर्षांपासून रोजगाराची वाट पाहत असलेल्या नांदगाव पेठ एमआयडीसीत आज हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सन २००८ पासून सुरू आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे.
नागपुरात, रेमंड, व्हीएचएम, गोल्डन फायबर, दामोदर इंडस्ट्रीज आणि सियाराम सिल्कसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नागपूर विदर्भ आडव्हान्टेज अंतर्गत सामंजस्य करार केला होता. यानंतर श्याम इंडोफेब ही कंपनी लुधियानाला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या श्याम इंडोफेब प्रा. लि. ने नांदगाव पेठ एमआयडीसीत आपले युनिट सुरू करण्याकरिता प्रयत्न केले. या माध्यमातून एमआयडीसीमध्ये १० हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत दोन मोठ्या उद्योजकांनी एकट्या अमरावतीत एक सामंजस्य करार केला आहे. ज्यामध्ये कापड उद्योग कंपनी श्रीधर कोटसन ३६९ कोटींची गुंतवणूक करून ५२० रोजगार निर्मिती करेल. त्याचप्रमाणे, औषध उत्पादक हरमन फिनोकेम ५६३ कोटी गुंतवून आपले युनिट स्थापित करत १५०० जणांना रोजगार देईल. अशाप्रकारे, अमरावतीत दोन मोठ्या बहुराष्ट्रीय उद्योगांना एका वर्षात खेचण्यात यश आले असून, हे मॅगनेटिक महाराष्ट्रामुळे शक्य झाले आहे. बेलोरा विमानतळातून टेकऑफ करण्याचे उद्दिष्ट वर्ष २०१२ मध्ये पूर्ण केले जाईल. जेणेकरून जिल्ह्यातील उद्योगांना हवाई पंख मिळतील आणि रोजगाराच्या क्षेत्रात खरोखरच भरभराट होईल. महिलांच्या संरक्षणाचा शक्ती कायदा लवकरच पारित होईल, असे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.