लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक राजापेठ परिसरातील झेंडा चौकात वास्तव्यास असलेले आणि शिक्षकी पेशात असूनही उभे आयुष्य कविता, साहित्यास समर्पित करणारे तुळशीराम काजे (८६) यांचे रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि कविमनाच्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. साहित्यक्षेत्रात काजे हे ‘नभ अंकुरले’कार म्हणून परिचित होते. सोमवारी त्यांच्यावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.तुळशीराम काजे यांचे ‘नभ अंकुरले’, ‘भ्रमिष्टाचे शोकगीत’ आणि ‘काहूरभैरवी’ हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्यांचे बालपण पुसनेर या खेडेगावात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात गेले. तेथे तिसरीनंतर शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे चौथीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना गावापासून दोन मैल अंतरावर असणाऱ्या नांदसावंगी येथे पायी जावे लागत होते. पुढे त्यांचे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण हिवरा (मुरादे) येथे झाले. पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना अमरावतीला यावे लागले.इयत्ता सातवी आणि आठवीचे शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूल मेन ब्रँच येथे झाले. त्यावेळी काजे हे राजापेठ येथे त्यांच्या वडिलांनी विकत घेतलेल्या घरून ये-जा करायचे. १९५० मध्ये ते मॅट्रिक झाले. १९६० साली त्यांनी वरूड तालुक्यातील लोणी येथे अध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी डी.एड.चे शिक्षण घेतले. पुढे बी.ए., बी.एड्. पूर्ण केले तसेच बहि:शाल संवर्गातून एम.ए. पूर्ण केले.आयुष्याची तब्बल ३० वर्षे लोणी या गावात त्यांनी व्यतीत केली. कविवर्य काजे तसे फारसे गर्दीत मिसळणारे नव्हते. काजे हे मुळात संकोची वृत्तीचे. गर्दीत मिसळणारा स्वभाव नसल्याने त्यांचे मित्र वामन तेलंग हे त्यांना ‘लाजाळूचे झाड’असे संबोधित करायचे.तुळशीराम काजे हे नि:संतान असूनही त्यांनी अलका उगले यांना मासनकन्या म्हणून स्वीकारले. हल्ली राजापेठच्या झेंडा चौक परिसरातील निवासस्थानी काजे यांच्या पत्नी विमल काजे, मानसकन्या अलका उगले व नातू सुमीत उगले हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
कवितेशी निष्ठा जपणारा शिक्षक काळाने हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:22 PM
स्थानिक राजापेठ परिसरातील झेंडा चौकात वास्तव्यास असलेले आणि शिक्षकी पेशात असूनही उभे आयुष्य कविता, साहित्यास समर्पित करणारे तुळशीराम काजे (८६) यांचे रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि कविमनाच्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देमृत्यूसोबत वर्षभराची झुंज शमली : तुळशीराम काजे अनंतात विलीन