श्यामकांत सहस्त्रभोजनी - बडनेराशहरालगत असलेल्या अवैध वीटभट्ट्याधारकांनी कहर माजविला असून शासकीय जागेवर विटभट्ट्या राजरोसपणे सुरु आहेत. विटभट्ट्यांच्या प्रदुषणामुळे परिसरातील रहिवासी वस्त्या, शाळा-महाविद्यालयाला याचा त्रास होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अवैध वीटभट्ट्यांबाबत महसूल विभाग मात्र बघ्याची भू्मीका घेत आहे.कोंडेश्वर , अंजनगाव बारी मार्ग, एमआयडीसी महामार्गावरील शासनाच्या ई क्लास सर्व्हे नं, ३५, ३६, ३९, ४०, ५२ व ५३ यासह इतरही जागेवर शासकीय तिजोरीला चुना लाऊत अवैध वीटभट्ट्या सुरू आहे. कोंडेश्वर मार्गाने देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांना याचा त्रास होत आहे. या मार्गावर शाळा असून वरूड शिवार वस्तीसुध्दा आहे. त्याचप्रमाणे अंजनगाव बारी रस्त्यावर देखील बरीच महाविद्यालये आहे. या सर्वांना वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. कोंडेश्वर रस्त्यालगतच बऱ्याच वीटभट्ट्या आहे. जिकडेतिकडे धुरच धूर दिसत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोफीया प्रकल्पात वेस्टेज असणारी भुकटी वीट बनविण्यासाठी वापरल्या जात आहे. त्याचे ढिग प्रत्येक वीटभट्ट्यांवर आहे. हवा आली की त्याची धूळ परिसरात पसरत आहे. एकूणच शासनाच्या जागेवर वीटभट्टीधारकांचा मनमानी कारभार सुरू आहे. बोटावर मोजण्याइतकेच वीटभट्टीधारक शासनाची रॉयल्टी भरून वीटभट्ट्या चालवित आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध वीटभट्ट्या शासनाचा मोठा महसूल बुडवित आहे. महसूल विभाग जिल्ह्यात अवैध वीटभट्टीधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे. मात्र, अमरावती शहराला लाखो वीट पुरविणाऱ्या बडनेऱ्यातील अवैध वीटभट्टीधारकांबाबत मूग गिळून गप्प का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. बडनेरा शहरातील वर्षानुवर्षे विटभट्ट्या चालविणारे मालक शासनाची रॉयल्टी किंवा इतर नियमांचे पालन करून वीटभट्ट्या चालवीत आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षात अवैधरित्या वीटभट्ट्या उभारण्याचा सपाटाच बडनेऱ्यात सुरू आहे. यामुळे वायूप्रदूषणात वाढ झाली असून नागरिकांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे.
वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर प्रदूषणाच्या विळख्यात
By admin | Published: February 03, 2015 10:47 PM