एकीकडे तापमानात वाढ झाल्याने सोयाबीन, कपाशी यासारख्या पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. मात्र, दमदार पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला. शेतीची कामे ठप्प पडल्याने शेतकऱ्यांना उसंत मिळाली. तथापि, आठ दिवसांपासून पाऊस सारखा सुरू आहे. त्यामुळे शेतातील निंदण, खुरपणी, डवरणी व फवारणी यांसारखी कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावल्याचे परिसरात चित्र आहे. पोळा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण ग्रामीण भागात मोठा सण मानले जाते. शेतमजूरही या सणाला कपडा किंवा काही खरेदी करतो. पण, आठ दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने मजुरांना घरी बसावे लागत आहे.
यंदा अल्प प्रमाणात मूग, उडदाची पेरणी झाली असली तरी सततच्या रिमझिम पावसामुळे शेंगा सडण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे काही पिकाला खतावणी होण्याचे थांबविल आहे. या पावसामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.