अमरावती : कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामूळे जिल्हाभरातील महसूल विभागाची सर्व कार्यालये ओस पडली आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ब्रिजेश वस्तानी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कलेक्ट्रेटच्या प्रांगणात ठिय्या दिला.
जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडीओ कार्यालय तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कालबद्ध आंदोलनाद्वारे सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे महसूल विभागाची कामे खोळंबली आहेत. याशिवाय विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी चकरा मारून परतावे लागत आहे. शिवाय शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची अडचण निर्माण होत आहे.
याशिवाय लाडकी बहीण या योजनेच्या आवश्यक कागदपत्रे मिळण्यासही अडचण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांना आवश्यक उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, शासनाच्या विविध योजनेचे अनुदान वाटप, याशिवाय अन्य कामे खोळंबली आहे. जिल्हाभरातील सर्व महसूल कार्यालयात सध्या रिकाम्या टेबल, खूर्चा दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनात सागर बनसोडे
मंगेश माहुलकर, सिद्धार्थ नवाडे, दिपक शिरसाट, गजानन टापरे, महादेव उमाळे, मदन जऊळकर, हरीश खरबडकर, लता पुंड, संगीता तांडील, जयश्री सातव, सुवर्णा रत्नपारखी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील प्रवेशद्वारावरच ठिय्या दिल्याचे दिसून आले.