अमरावती : अवकाळी पावसाचा कृषिमालाला मोठा फटका बसला आहे. पावसाने तूर झोपली, कापसाची बोंडे भिजली, तर संत्रा गळाला आहे. केळीसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक मात्र अद्याप सुरळीत असून पावसाचा नक्की काय परिणाम झाला, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ३० नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती राहील, असे संकेत वर्तविले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कापूस, तूर आणि संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहारवर असलेला संत्रा गळल्याने उत्पादक हैराण झाले आहे. काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत विक्रीचा व्यवहार करून ठेवला होता. मात्र, अवकाळी पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नावर विरजण आणले आहे. तर तूर फुलाेरावर असताना पावसाने ती पूर्णत: झोपली आहे. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घसरली आहे. भाजीपाला कमी येत असल्याची माहिती भाजीपाला दलाल सलीम खान यांनी दिली.
तुरीचा फुलोर जळणार?
हिवरखेड : संत्रा बगीच्यांची अद्याप तोड झालेली नाही. त्यांचे नुकसान होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या वातावरणामुळे तुरीचा बहर जळण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. वालाच्या वेलांवर मोहा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
कापसाला फटका, हरभऱ्यासाठी वरदान
वनोजा बाग : अवकाळी पावसाने फुटलेला कापूस ओला झाला असून, तो माती गळून खराब होण्याची चिन्हे आहेत. परंतु, हे दीर्घ मुदतीचे पीक असल्याने नवीन पात्या, फुले येऊन भरपाई होईल, असा कयास वर्तविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू हरभरा पेरणी केली, त्यांना हा अवकाळी पाऊस नवसंजीवनी ठरणार आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी शेत भिजवून हरभऱ्याची पेरणी केलेली आहे, पावसाने अधिक मुक्काम केल्यास त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे क्षेत्रवाढ होण्याचा व दुबार हरभरा पेरणीचा अंदाज पाहून बाजार समिती तसेच बाहेर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरभऱ्याची विक्री बिजवाईच्या दृष्टीने थांबविल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला
तिवसा : पावसामुळे भार वाढल्याने तूर पिकाने लोटांगण घेतले आहे. तर रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणाऱ्या हरभरा पिकाला अतिरिक्त पाणी झाल्याने हे पीक खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले, नुकतेच शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला उपसा सिंचन योजनेच्या व अपर वर्धा धरणाच्या पाण्यातून सिंचन केले होते. त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने हरभरा पिकांवर अरिष्ट ओढवले.
काळी पानपिंपरी झाली पांढरी
अंजनगाव सुर्जी : तोडणीला आलेली आणि काहींनी शेतातच वाळवणीला टाकलेली वनौषधी पानपिंपरी अवकाळी पावसामुळे व दोन दिवसात सूर्यप्रकाश न मिळाल्याने काळ्याची पांढरे झाले. त्यामुळे पिकाचा दर्जा खालावला असून लागलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सिंचनाचा वापर करून हे पीक जगविले. आता उत्पादन घेण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने घात केला. त्याच वेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील केळी, कपाशीसहीत इतरही पिके धोक्यात आली आहेत. १२ महिन्यांचे हे पीक घरी न आल्यास काय होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
संत्रा उत्पादकांची वाढली चिंता
वरूड : दोन दिवसांपासून जिल्ह्यासह तालुक्यात अवकाळी पावसाने संत्रा उत्पादकांची चिंता वाढवली. वादळी पावसामुळे संत्रा गळती झाली असून भावात घसरण झाली. पावसामुळे रस्ते चिखलमय झाल्याने संत्रा व्यापाऱ्यांचे मालवाहू वाहने जात नसल्याने संत्रा तोड बंद आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. अवकाळी वादळी पावसाने तूर्तास संत्रा उत्पादकांची चिंता वाढविली आहे. गळतीमुळे संत्रा पिकाचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीलाही फटका बसला असून शेतात असलेला कापूस वेचणीपूर्वी ओल झाला. दुसरीकडे गहू, हरभरा या पिकांना हा अवकाळी पाऊस फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी, कही गम' अशी अवस्था झाली आहे.
अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला
तिवसा : पावसामुळे भार वाढल्याने तूर पिकाने लोटांगण घेतले आहे. तर रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणारे हरभरा पीक अतिरिक्त पाणी झाल्याने खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. शेतकऱ्यांनी हरभराला उपसा सिंचन योजनेच्या व अपर वर्धा धरणाच्या पाण्यातून सिंचन केले होते. त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने हरभरा पिकांवर अरिष्ट ओढवले.
चांदूर रेल्वे तालुक्यात पिकांचे नुकसान
चांदूर रेल्वे : तालुक्यात दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस असून, कापूस, तूर व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. महसूल विभागाने तत्काळ सर्व्हे करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत शिरभाते यांनी केली. एकीकडे सोयाबीनचा पिकाचे नुकसान अत्यल्प पीक झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच कापूस आणि तूर पिकावर कर्जाची परतफेड होईल, अशी आशा होती. परंतु पावसाने अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आशा मावळली. याबाबत शासनाने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना भेट द्यावा, अशी मागणी करण्यात आली.