विकासकामांसाठी ६.४५ कोटींच्या निधींची भर, सुलभा खोडके यांची अधिवेशनात मागणी
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारत निर्मितीसाठी आतापर्यंत ३३ कोटींचा निधी प्राप्त झाला. आता मेडिकल गॅस पाईप, सोलर वॉटर हिटर, सीसीटीव्हीची सुविधांची भर पडणार आहे. या विकासकामांसाठी ६.४५ कोटी नव्याने निधीची मागणी सोमवारी होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार आहे. आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुरवणी निधीच्या मागणीसाठी पाठपुरावा चालविला आहे.
हल्ली डफरीनमध्ये २०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आता भौतिक सुविधा व यंत्रणांच्या कामास आ. सुलभा खोडके यांनी ६ कोटी ४५ लक्ष ६९ हजाराचा निधी मंजूर करून आणला आहे.
दीड वर्षाच्या कार्यकाळातच आतापर्यंत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल २६.६४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. दरम्यान आ. खोडके यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावादेखील वेळोवेळी घेऊन येथील सोयी- सुविधांचीसुद्धा प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अशातच आता २०० खाटांच्या रुग्णालयाचे ४०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली असून याठिकाणी उर्वरित मेडिकल गॅस पाईप लाईन यंत्रणा, सोलर वॉटर हिटर, रूफ टॉप प्लॉट, सीसीटीव्ही आदी कामे पूर्णत्वास येणार आहे.