रुग्णालय परिसर स्वच्छ : जिल्हाधिकार्यांनी घेतली दखल, मागितला खुलासाअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) दुरवस्थेचे सचित्रवृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच जिल्हाधिकार्यांनी डफरीन प्रशासनाला खुलासा मागितला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून डफरीनची सिक्युरिटी टाईट करण्यात आली असून साफसफाईकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिवसेंदिवस वाढत होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. बरेचदा डफरीनमध्ये बाळबाळंतिणींचे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. मागील काही महिन्यात दिवसाला एका बाळाचा मृत्यू होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल शासनस्तरावर घेतली गेली. तसेच जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी डफरीन प्रशासनाला याबाबत खुलासा मागितला. त्यामुळे प्रशासनाची सावरासावर सुरु झाली. रुग्णालय परीसर तसेच वॉर्डातील दुरवस्था सुधारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. साफसफाईकडेही विशेष लक्ष देण्यात आले. मुख्य म्हणजे तेथील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यात आलीे आहे. सद्यस्थितीत डफरीनमध्ये १५ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असुन दोन्ही गेटवर दोन सुरक्षा रक्षक ये-जा करणार्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश दिला जात आहे.(प्रतिनिधी)
डफरीनची सिक्युरिटी झाली टाईट
By admin | Published: June 03, 2014 11:45 PM