‘एक्साईज’ची कारवाई: तिघांना अटक, लाखोंचे साहित्य जप्त अमरावती : जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये अनधिकृतपणे सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्या बुधवारी उद्ध्वस्त करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली. यामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले असून मद्य बनविण्यासाठी वापरले जाणारे लाखोंचे साहित्य जप्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात ‘एक्साईज’च्या भरारी पथकाने सीमेवरील गावांमध्ये अवैध दारु गाळणाऱ्या केंद्रावर धाडसत्र राबविले. अमरावती निरीक्षक, मोर्शी या पथकाने वडाळी येथील परिहार पुरा, कुऱ्हा जकात नाकास्थित राजुरा बेडा, दिवानखेड व शिंदवाडी येथे गावठी दारु बनविणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली. यात सुरेश डोमाजी कोहाड (६५, रा. देऊरवाडा), पुनियाबाई मूलचंद नायकवाड (६०, परिहारपुरा, वडाळी), कमलाबाई नायकवाड (५०, रा.परिहारपुरा वडाळी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुप्त माहितीच्या आधारे अवैध गावठी दारुची निर्मिती होत असल्याची माहिती एक्साईजला मिळाली होती.एक्साईज विभाग राबविणार धाडसत्रअमरावती : त्याआधारे या धाडी टाकण्यात आल्यात. यात ११० लिटर गावठी दारु, मोहा रसायन २८०० लीटर तसेच तीन चाकी आॅटोरिक्षा असा एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ब, क, ड, फ, ई नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याकारवाईत निरीक्षक एस. एस. लांडगे, एस. वाय. श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक बेदरकर, अजमिरे, मावळे, गभणे, रंदये, राऊतकर, नांदणे, भारती, राहुल जयस्वाल, अंकुश काळे, मोकळकर, भोकरे, खैरकर, भारसाकळे आदींचा सहभाग होता. गावठी दारुविक्री-निर्मिती विरोधात एक्साईज सतत कारवाई करणार असल्याचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले. अवैध दारुविक्री अथवा परप्रातांत निर्मित दारुची विक्री होत असल्यास एक्साईज कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन के ले आहे. कुऱ्हा जकात नाक्याच्या बाजुला राजुरा पारधी बेडा परिसरात अवैध गावठी दारु गाळणाऱ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. घटनास्थळावरून १९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एक्साईजच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जलद पथकाचे सुधीर गावंडे, प्रमोद येवतीकर, पीएसआय कांबळे, इंगळे, रंधे, राऊतकर आदींनी कारवाई केली. (प्रतिनिधी)
गावठी दारुच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 12:04 AM