तक्रार : दखल घेऊन कारवाईचे आदेशचांदूरबाजार : स्थानिक प्रभाग तीनमधील प्रशासकीय मान्यता असलेल्या तीन कामांची सुरुवात करण्यात मुख्याधिकारी नगर पालिकेत राजकारण करून कामांबाबत अडथळा निर्माण करीत असल्याची लेखी तक्रार नगरपालिकेचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मंजूर कामांना त्वरीत सुरूवात न केल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप फोडण्याची सूचना पत्राद्वारे उपाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.प्रभाग तीनमधील बीआरजीएफ अंतर्गत काँक्रीट नाली व रस्ता, जिल्हा नियोजन विकास योजनेंतर्गत येणारी विकासकामे, अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत मंजुरी मिळालेली कामे सुरु करण्यास मुख्याधिकारी यांच्याकडून सातत्याने अडथळा निर्माण होत आहे. पहिल्या कामांसाठी १६ मे २०१६ व २० एप्रिल २९१६ निविदा मागविली होती. त्या निविदा अद्याप पावेतो मुख्याधिकाऱ्यांनी उघडल्यासुध्दा नाहीत. तसेच कामाबद्दल ई-निविदा काढण्याची वारंवार विनंती केली असता, ती त्यांनी अन्य कारणे सांगून फेटाळून लावलीत.शहर विकासाची लोकपयोगी कामे पावसाळयापुर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मंजूर कामे कोणतेही कारण नसताना हेतू पुरस्सर रोखून ठेवणे योग्य नाही, असे अनेदा मुख्याधिकाऱ्यांना उपाध्यक्षांनी सांगितले. त्याचा संबंधितांवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मुजफ्फर हुसने यांनी सरळ जिल्हाधिकारी यांचेकडे मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या तक्रारी अर्जाची त्वरीत दखल घेऊन त्याच दिवशी, चांदूर बाजार मुख्याधिकारी यांना पत्र देऊन तक्रारीतील मुद्यांबाबत तत्काळ कार्यवाही करून, केलेल्या कार्यवाहीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय व तक्रारकर्त्यास देण्यात यावी, असे जिल्हाप्रशासन अधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहिने कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
विकास कामांमध्ये मुख्याधिकाऱ्यांचा खोडा
By admin | Published: June 11, 2016 12:15 AM