अमरावती : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आरोग्य विभागातील परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील आरोग्य यंत्रणेचा डोलारा हा रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आपल्या खांद्यावर घेऊन आरोग्य यंत्रणा ढासळू न देता रुग्णसेवा निकोपपणे सांभाळली. संपकाळातील सात दिवसांत रुग्णांची सेवा करताना स्वकीयांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या रोषाचाही सामना करावा लागल्याचा अनुभव विद्यार्थिनींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
परिचारिकाशिवाय आरोग्य विभागाची कल्पनाच करणेच कठीण आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये परिचारिका ही सर्वांत महत्त्वाची असून तिच्याशिवाय आरोग्य विभागाचा डोलारा चालणे कठीण आहे; कारण डॉक्टरांपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी जवळचा संबंध हा परिचारिकांचा येतो. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यापासून तो परिपूर्ण बरा होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी ही कार्यरत परिचारिकेवर असते. त्यामुळे संपात सहभागी परिचारिकांचा परिणाम हा आरोग्य विभागात सर्वाधिक जाणवला. परिचारिकांमुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबल्या. मात्र आरोग्ययंत्रणा ढासळू नये, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत कंत्राटी परिचारिका तसेच जेएनएम, एएनएम अभ्यासक्रमातील शिकाऊ विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाचा डोलारा सोपविला होता. यावेळी कंत्राटी परिचारिकांच्या मदतीने या विद्यार्थिनींनी दिवसा तसेच रात्रीही इर्विन, डफरीन रुग्णालयात सेवा देऊन आरोग्य यंत्रणेचे नावलौकिक केले.रात्रंदिवस काम करावे लागले
एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर परिचारिका म्हणून मी जिल्हा स्त्री-रुग्णालयात (डफरीन) गत चार महिन्यांपासून काम करीत आहे. परिचारिका संपात सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे इर्विन रुग्णालयाची जबाबदारी सोपविली. यावेळी रुग्णालयातील अधिपरिचारिका कार्यालयातील सर्व जबाबदारी माझ्यावर होती. शिकाऊ विद्यार्थिनींची वाॅर्डामध्ये ड्यूटी लावण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही शिफ्टमध्ये काम करावे लागले. एका पाळीत जवळपास ४० च्या जवळपास विद्यार्थिनी होत्या. याबरोबरच इंजेक्शन, ओपीडी, रुग्णांची जबाबदारी माझ्यावर होती.वैष्णवी राजगडकर, कंत्राटी परिचारिका
रुग्णांचा सांभाळ करणे कठीण
यापूर्वी रुग्णालयातील परिचारिका यांच्या मार्गदर्शनामध्ये कधी-कधी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले; परंतु यावेळी परिचारिका संपावर गेल्यामुळे संपूर्ण वॉर्डाची जबाबदारीच आली होती. संपाच्या या सात दिवसांमध्ये रुग्णांचा सांभाळ करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. रात्रीच्या वेळीही आम्हाला सेवा द्यावी लागली. यामध्ये आम्ही परिपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच काही सेवा देण्यास विलंब झाला तर रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या रोषाचाही कधी-कधी सामना करावा लागला. परंतु या आठ दिवसांतील अनुभवातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली.
प्रतीक्षा ठाकरे, विद्यार्थिनी, जेएनएम नर्सिंगरुग्णालयातील परिचारिका संपात सहभागी झाल्यामुळे कंत्राटी परिचारिका तसेच जेएनएम, एएनएम नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींवर रुग्णालयातील जबाबदारी दिली होती. तसेच यासोबतच अनुभवी डॉक्टरांच्याही सेवा नियमित केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मदतीने कंत्राटी परिचारिका व विद्यार्थिनींनी रुग्णालयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक