फोटो पी ३१ चांदूराबाजर
चांदूर बाजार : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ जे च्या निर्माणकार्यावर संबंधित कंपनीकडून अपेक्षित पाणी टाकले जात नसल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम शहराच्या सीमेपर्यत येऊन ठेपले असून, मुख्य बाजारपेठेमधून रस्ताच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. अशात या मार्गावर रस्ता बांधकामामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण पसरले आहे. या मातीकामावर पाणी टाकण्यात येत नसल्याने बाजारपेठेत दुकाने लावणारे व्यापारी तसेच अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या धुळीचा मोठा फटका बसत आहे. यादरम्यान पर्यायी वाहतुकीकरिता शहरातील मार्गाव्यतिरिक्त इतरत्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने काम सुरू असलेल्या या मार्गावरच वाहनांची वर्दळ असते. यात नेहमी गजबजलेल्या मुख्य नेताजी चौकात रस्ताचे काम सुरू असून, या रस्ताच्या या बाजूला ग्रामीण रुग्णालय, दवाखाना, मेडिकल, महिला नागरी बँक, भारतीय स्टेट बँकचे एटीएम अशा अत्यावश्यक सेवेतील प्रतिष्ठाने आहेत. संबंधित प्रतिष्ठानात धुळीचे लोट पसरून त्रास होत असल्याचा तक्रारी नागरिकांतर्फे केल्या जात आहेत.
धुळीच्या कणांमुळे एलर्जी, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास वाढला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात धुळीच्या संसर्गातून हा आजार तर होणार नाही ना, ही भीती सर्वसामान्यांना सतावत आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महामार्ग महत्त्वाचा आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन ही कामे व्हावी, अशी मागणी होत आहे.