अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर अमरावती तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक तसेच वलगांव, डवरगाव, शिराळा, वडाळी, अमरावती, नवसारी, माहुली जहांगिर, नांदगाव पेठ, बडनेरा आदी ठिकाणच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी अशा ५४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश अमरावती तहसीलदार यांचे स्वाक्षरीने ८ जून रोजी जारी केला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले होते. परंतु, आता कोरोना संसर्गाची परिस्थितीत नियंत्रणात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नुकतेचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी काेरोनापासून बचाव करणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने खबरदारीचा भाग म्हणून नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ॲंटिजेन स्टेट केली जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अमरावतीचे तहसीलदारांनी टोल नाक्यावर अमरावती तालुक्यातील विविध शाळेवर कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसह, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या नेमणुका ९ ते २९ जूनपर्यंत करण्यात आल्या आहेत. याकरिता तहसील कार्यालयाने संबंधितांना नेमणुकीच्या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना या आदेशात दिल्या आहेत.