फोटो - २१ एस शेंदूरजनाघाट
शेंदूरजनाघाट : कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ ही योजना सरकारने राबवली. यामध्ये राज्यातील अनेक शिक्षकांनी आपआपल्या परीने नवनवीन माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेंदूरजनाघाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक संजय पंजाबराव ढोक यांनी ई-बूक तयार करून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययनास मदत केली.
संजय ढोक यांनी शैक्षणिक व्हिडीओची निर्मिती करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याहीपुढे जाऊन विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा व्हिडिओचा संग्रह एका क्लिकवर पाहता यावा, यासाठी ई-बूक ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यातूनच इयत्ता दहावीचे इतिहास व राज्यशास्त्र आणि कुमारभारती (पद्य) या विषयांचे ई-बूक तयार केले. अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते १९ मार्च रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजराव काळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्हे, विशेष कार्य अधिकारी संजय कडू, राहुल मोहोड, माया हिवसे, पंकज व्हेराटे, चेतन डोंगरे उपस्थित होते.