फोटो - अचलपूर १० एस
६५३८ हेक्टरवरील रबी पीक नोंदविले
अचलपूर : एक दिवस ई-पीक पाहणी नोंदणी अभियानांतर्गत अचलपूर तहसील प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त राबविण्यात आलेल्या अभियानात एकाच दिवशी २२५८ शेतकऱ्यांची रबी पिकांची नोंदणी करण्यात आली. ई-पीक नोंदणी मिशन मोडवर राबविण्याकरिता एकाच दिवशी महसूल व कृषी विभागाच्या ६५ कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आणि ६५३८ हेक्टरवरील पीकाची नोंद घेण्यात आली.
अचलूपर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत अचलपूर तालुक्यातील २० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंदणी केली आहे. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ई-पीक पाहणी वेगाने वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मोबाईल अॅपवर नोंद घेण्याचा निर्णय अचलपुरात घेण्यात आला.
अचलपूर तालुक्यातील सहा महसूल मंडळांतील असदपूर, परसापूर, पथ्रोट, रासेगाव, परतवाडा या भागांतील २२५८ शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत नोंदी घेतल्या. यात गहू, चणा, कांदा, संत्रा अशा विविध पिकांचा समावेश करण्यात आला. ‘मिशन मोड’वर काम करीत असताना तहसील व कृषी कार्यालयात प्रत्येक तीन तासांनी नोंदविलेली आकडेवारी एकत्रित करण्याकरिता एक कक्ष उभारण्यात आला होता. निवडणुकीच्या मतमोजणीला अनुरूप यंत्रणा राबवून पीक नोंदणीचा आढावा घेतला जात होता. याकरिता तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दिवसभर विविध शेतांवर उपस्थित राहिले.
या पीक पाहणी नोंदणीकरिता तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींनी सक्रिय सहभाग दिला.
कोट
अद्यावत ई-पीक नोंदीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची शासकीय आधारभूत केंद्राच्या अनुषंगाने नोंदणी होईल. कृषी पतपुरवठा सुलभ होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळेल.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर
--