अमरावती : गोवंशांचे जतन करून त्यांची तस्करी व कत्तल रोखण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवर पाऊल उचलले आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व पशुंचे 'इअर टॅगिंग' करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यापुढे इअर टॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास त्याला शासनाकडून नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही. टॅगिंगमुळे सर्व पशुधनाचा डाटा बेस तयार होणार आहे व तस्कर, अवैध कत्तलीस आळा बसण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये पशुधनाला इअर टॅगिंग केले जाते व त्या पशूचा एक १२ अंकी बारकोड तयार करण्यात येतो. यामुळे त्या पशूच्या जन्म- मृत्यूपासून ते प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार व मालकी हक्कापर्यतची सर्व माहिती उपलब्ध होते. इअर टॅगिंगमुळे पशुंमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगाची त्वरित माहिती मिळणे शक्य होणार आहे. पशुधनातील रोग व मानवी आरोग्याला प्रभावित करणाऱ्या रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या प्रणालीमध्ये गाय वर्ग, म्हैस वर्ग, लहान जनावरे व मोठ्या जनावरांना इअर टॅगिंग करून त्यांची माहिती भारत पशुधन प्रणालीवर भरण्यात येते. यामुळे पशुधनाच्या जन्मापासून ते खरेदी- विक्रीपर्यंत सर्व नोंदींची माहिती उपलब्ध होते. जिल्ह्यात जवळपास सहा लाखांवर पशुधनाचे इअर टॅग करण्यात आले आहे.- डॉ. पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. अमरावती दृष्ट्रीक्षेपात पशुधनाची आकडेवारीगायवर्गीय पशुधन-४ लाख ६४ हजार ९६७म्हैसवर्गीय पशुधन-१ लाख २९ हजार ६२७एकूण पशुधन - ५ लाख ९४ हजार ५९४