अमरावती : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज (दि १०) दुसरा आणि शेवटचा दिवस असून ते अमरावतीत दाखल झाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना, आपण सभांसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांसाठी दौरे करतोय. कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी फिरतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी वाशिम-यवतमाळच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर, आज ते अमरावतीत दाखल झाले आहेत. विश्राम भवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला. पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं अशी, खोचक टीका त्यांनी सत्ताधारी पक्षावर केली. मी रुग्णालयात असताना यांच्या हालचाली वाढल्या, रात्रीच्या गाठीभेटी चालल्या होत्या. तेव्हा पूजापाठ कोण करत होतं याचं उत्तर त्यांनाचं विचारावं, असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेवंर टीकेचे बाण सोडले.
हल्ली पक्षच चोरू लागले आहेत. राज्यातील वर्तमान परिस्थिती पाहता मला सामना चित्रपटाची आठवण आली. त्यात गाणं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मी माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्याला देणार नाही, शिवसेना हे नाव माझ्याकडेच राहणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले. सोबतच आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी चूक केली असेल, त्याला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला हवा का, यावर देशात विचार करायला पाहिजे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, त्यांच्या आगमनापुर्वीच अमरावतीत वातावरण तापले. ठाकरेंच्या स्वागतासाठी अमरावतीत पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते. तर दुसरीकडे त्यांना डिवचण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचे बॅनर लावले होते. या बॅनरबाजीवरून वाद चिघळला. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले. याला प्रत्युत्तर म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले.
राणा समर्थक एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी पोलिसांच्या समोरच उद्धव ठाकरे मुक्कामाला असणाऱ्या विश्राम भवनावरील ठाकरे यांचे पोस्टर फाडले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. राणा समर्थकांनी आज शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसा पठणाची तयारी केली होती पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हनुमान चालिसा पठण करण्यावर समर्थक ठाम असल्याचे दिसले. हे पाहता पोलिसांनी कारवाई करत राणांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.