अमरावती : पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण अचूक वर्तुळाकार मार्गाने न फिरता लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते. पृथ्वी कधी सूर्यापासून लांब, तर कधी जवळ असते. यावेळी ३ जानेवारीला पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर १४.७१ कोटी किलोमीटर राहील. नेहमी हे अंतर १५ कोटी किलोमीटरच्या दरम्यान असते. म्हणजेच या दिवशी पृथ्वी व सूर्याचे अंतर सर्वात कमी राहणार आहे.
पृथ्वी व सूर्यातील अंतर कमी असणे या खगोलीय घटनेला उपसूर्य म्हणतात. सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनविण्याची क्रिया निरंतर सुरू असते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो व त्यापासून ६५ कोटी २५ लाख हेलियम बनतो. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होते.
सूर्यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनतो, हा शोध १९३९ मध्ये हॅन्स बेथ या वैज्ञानिकाने लावला. सूर्यावर ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षाचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये ‘श्वावे’ या वैज्ञानिकाने लावला. या डागाची आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाली आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. या खगोलीय घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे
सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती एक फेरी मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात. सूर्य हा आकाशगंगेच्या मध्याभोवती २५० किमी प्रतिसेकंद या वेगाने फिरत असतो. सूर्याच्या आजवर २० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक ‘सर ऑर्थर एडिंग्टन’ होय. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी पाच अब्ज वर्षे संपली आहेत. आणखी पाच अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत बटू ताऱ्यात होणार असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले.