रानभाज्या खा अन् निरोगी राहा…..
मेळघाटसह जिल्ह्यात ६६ रानभाज्यांची नोंद
अनिल कडू
परतवाडा : सातपुड्याच्या कुशीत कोरकू आदिवासी बांधवांचे वसतिस्थान असलेल्या मेळघाट या समृद्ध वन्यप्रदेशासह जिल्ह्यात एकूण ६६ रानभाज्यांची नोंद घेण्यात आली आहे.
परतवाडा येथील आयुर्वेद रत्न आणि सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल तथा औषधी वनस्पतीसह रानभाज्यांचे अभ्यासक रा. भ. गिरी यांनी या ६६ रानभाज्यांची नोंद केली आहे. यात पानभाज्या, फुलभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे.
आरोग्यदायी रानभाज्या ऋतुमानानुसार सहज उपलब्ध होतात. निसर्गाचा हा समृद्ध ठेवा आहे. या रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे आणि अनेक औषधी गुणधर्म असतात. निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या प्रदूषणमुक्त ठरतात. रानभाज्यांच्या सेवनामुळे शरीराला दीर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात.
पाऊस सुरू झाला की, रानावनात जंगलात शेताच्या बांधावर गावाशेजारी या रानभाज्या उगवू लागतात. पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ राहते. नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या प्रदूषणमुक्त या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या राहतात. या भाज्या खायलाही रुचकर लागतात. वर्षभर मेथी, शेपू, पालक, कोबी, फ्लॉवर, तोंडली, कारले, भोपळा, वांगी खाणाऱ्यांनाही या रानभाज्या हव्या असतात. पण, रानभाज्यांची ओळख नसल्यामुळे ते त्यापासून दूर राहतात. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि गावपातळीवरील जुनी मंडळी व जाणकार आजही या भाज्यांचे नियमित सेवन करतात.
दरम्यान, कर्टुली, अंबाडी, लाल अंबाडी, भारंगी, तरोटा, अळू, वाघाटे, बांबू, शमी, उंबर, पाथर, मालकांगुनी,सुरण, पांढरी मुसळी, शेवगा, भोकर, आघाडा, जिवतीची फुले या रानभाज्यांची ओळख प्रसंगानुरूप सर्वांनाच आहे.
या रानभाज्यांना राजाश्रय देण्याचा कृषी विभागाने प्रयत्न चालविला आहे. रानभाज्यांची लोकांना ओळख व्हावी. त्याचे महत्त्व पटावे. रान भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता रानभाज्यांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव ठीक ठिकाणी कृषी विभागाकडून भरवला जात आहे.
--- या रानभाज्या आपल्याला ठावूक आहेत का?---
* वाघाटी-- हा एक वेल असून, त्याच्या कोवळ्या फळांची भाजी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशीला वाघाटीचा मान आहे. ती एक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी रानभाजी आहे.
* आघाडा-- आघाडा पावसाळ्यात जंगलात व शिवारात आपोआप उगवून वर येतो. आघाड्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात. आघाड्यात झिंक, तांबे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. आघाड्यात हाडे मजबूत करायचे गुण आहेत. मधुमेहींसाठीही आघाडा उपयुक्त आहे.
* केना--- विड्याच्या पानाच्या आकाराची, परंतु थोडी लहान वनस्पती पावसाळ्यात उगवते. केनाच्या पानांची भजी किंवा भाजी करतात. या भाजीमुळे पचन क्रिया होऊन पोट साफ होते. लघवी साफ होण्यास मदत होते. त्वचाविकार, सूज आदी विकार कमी होतात.
* तरोटा-- पावसाळ्यात हा तरोटा उगवतो. या तरोट्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. मेथीच्या भाजी सारखी ती लागते. पुढे याला पिवळी फुले येतात आणि बारीक करंगळीसारख्या शेंगा लागतात. तेव्हा या पानांची भाजी केल्या जात नाही. बियांपासून कॉफी, लाडू तसेच खाद्यरंगही बनवतात. तरोटा चर्मरोगावर अत्यंत उपयुक्त आहे. अंगाला येणारी खाज, सर्व प्रकारची खरूज, बारक्या गाठी याच्या सेवनाने नाहीशा होतात. पानांची भाजी शरीरातील वात व कफदोष कमी करतात. पित्तज, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.
* कर्टुले -- कर्टुले/कटुले ही सुद्धा रानभाजी आहे. पावसाळ्यात जंगलात नैसर्गिकपणे वेल उगवतात. कर्टुल्याची फळ श्रावण भाद्रपद महिन्यात विकायला येतात. या कर्टुल्याची भाजी करतात. कर्टुले/ कटुले हे औषधी गुणांनी युक्त आहेत. यात मोठ्या प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर उपलब्ध आहेत. मधुमेहामध्ये या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
* शेवगा - शेवग्याची पाने, शेंगा, फुले, मूळ उपयुक्त आहेत. हा वार्षिक वृक्ष आहे. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व शेंगांची भाजी करतात. शेवग्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट जीवनसत्व व केळाच्या तीन पट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिने असतात. शारीरिक व मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून मधुमेह व उच्च रक्तदाबावर शेवगा उपयुक्त आहे.
* अळू- अळू,आरवी व धोपा या नावानेही ओळखले जाते. ही एक रानभाजी असून अळूच्या पानांची भाजी करतात. आळुच्या पानाच्या वड्याही करतात. अळू ही औषधी वनस्पती आहे.
* या रानभाज्या झाल्या दुर्मीळ--
-- जिवतीची फुले :- ही एक रानभाजी आहे. ती बहुतांश भागातून नष्ट झालेली आहे. काही ठराविक भागातच ती आढळून येते. या दुर्मीळ अशा फुलांची भाजी केली जाते. औषधी गुणधर्मयुक्त या जिवतीच्या फुलांचा टॉनिक म्हणून वापर केला जातो. चवनप्राशमध्ये त्याचा वापर होतो.
*-- सफेद मुसळी-- ही औषधी युक्त शक्तिवर्धक रानभाजी जंगलातून जवळपास नाहीशी झाली आहे. शिवारात काही लोक त्याचे पीक घेतात. सफेद मुसळीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
* कडुसले - ही एक दुर्मीळ, शिवारात आढळणारी रानभाजी आहे. कारल्याप्रमाणे त्याची भाजी करतात. मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याकरिता त्याचा उपयोग होतो. कडुसले ही रानभाजी तणनाशकाच्या फवारणीमुळे जवळजवळ नष्ट झाली आहे.
* कोट-
शक्तिवर्धक रानभाज्या
सफेद मुसळी, घोटवेल शक्तिवर्धक असून मालकांगणी बुद्धिवर्धक आहे. वाघाटी रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. कर्टुले डायबिटीजवर उपयुक्त आहेत. कंदही औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. कर्टुल्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स व फायबर आहेत. सर्वच रानभाज्या आरोग्यदायी आहेत. रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ, व इतर खनिजे आणि औषधी गुणधर्म आहेत.
- रा.भ. गिरी, आयुर्वेदरत्न सेवानिवृत्त वनाधिकारी.