नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला हजार ते १,२०० रुपये प्रतिक्रेटचे भाव होते. ते कोसळून आता चांगल्या प्रतीच्या मालाला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळत आहेत.
माहुली चोर शिवारात अनिल झंझाट या शेतकऱ्याने चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. १ ऑक्टोबरपासून माल निघणे सुरू झाले. दररोज दोनशे क्रेटचे उत्पादन निघत होते. तो अमरावती बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात होता. त्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेटचे भाव मिळत होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील टोमॅटोचे दर पाहता इतरही बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक वाढली. कोरोनाच्या संकटामुळे व बाजारपेठेत मागणी घटल्याने दर कोसळून आता दीडशे ते दोनशे रुपये क्रेटवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
कोट
चार एकर टोमॅटो लागवडीसाठी व मशागत, मजुरी, खते, वाहतूक, फवारणी इत्यादीसाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. १० ऑगस्टला लागवड केलेल्या झाडावरचा १५ ते ३० एप्रिलपर्यंत माल निघतो. पण बाजारपेठेतील भाव पडल्याने झाडावरील माल तोडणे व वाहतूक याचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून माल तोडणे बंद केले.
- अनिल झंझाट,
शेतकरी, माहुली चोर