अमरावती : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत होते. वर्षभराच्या कालावधीत प्रति लिटर ६० ते ७० रुपयांची वाढ झाली होती. दर आठ दिवसांनी तेलाचे भाव वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. आता अशातच मागील आठ दिवसांपासून तेलाचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहेे. ते पूर्वपदावर येण्याची शक्यता दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.
देशाला जेवढे खाद्यतेल आवश्यक आहे, त्याच्या केवळ ३० टक्के उत्पादन देशात होते. उर्वरित खाद्यतेल दुसऱ्या देशातून आयात करावे लागते. त्यामुळे तेलाचे भाव नेहमीच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहतात. वर्षभरापूर्वी सोयाबीन तेलाचा एक लिटरचा पॉकेट केवळ ९० रुपयांना मिळत होते. त्याचा भाव १६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील आठ दिवसांत या तेलाचे भाव कमी होऊन ते आता १३५ रुपये दराने उपलब्ध होत आहे. याचप्रमाणे इतरही खाद्यतेलांचे भाव कमी होत आहेत. तेलाचे दर वाढल्याने भाजीतील तेल कमी झाले होते. तसेच चमचमीत पदार्थही खाणे कमी झाले होते. आता यथेच्छ पदार्थ तळता येणार आहेत. तेलाचे दर कमी होत चालले असल्याने गृहिणींमध्येही थोडाफार आनंद दिसून येत आहे.
बॉक्स
साठा करणाऱ्या दुकानदारांचे नुकसान
खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने त्यातून अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काही दुकानदारांनी खाद्यतेलाची साठवणूक करून ठेवली. तसेच काही व्यापाऱ्यांनी वाढीव दराने पहिलेच तेल बुकिंग करून ठेवले. आता मात्र भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिकच्या दराने खरेदी केलेले खाद्यतेल कमी किमतीने विकावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना तोट्याचा सामना करावा लागत आहे.
कोट
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
१) २० वर्षांपूर्वी शेतात जवसाचे उत्पादन घेतले जात होते. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे जवसाचे तेल चक्कीवर काढले जात होते. उर्वरित जवस विकले जात होते. जवसाच्या शेतीची जागा सोयाबीनने घेतली. तेव्हापासून दुकानातून खरेदी केलेले तेल खावे लागत आहे. आता तर सोयाबीनच्या ऐवजी कापसाची लागवड केली जात आहे.
- रामरतन देशमुख, मोर्शी
२) काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करायला सुरुवात केली होती. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कापूस पिकाकडे वळला. विदेशातून तेल आयात करण्यापेक्षा शासनाने तेलबिया वर्गीय पिकांना चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकचा भाव द्यावा लागेल.
- प्रभाकर कापसे, राजना
--------------
बॉक्स
खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
आधीचे आताचे
सूर्यफूल : १९० - १६०
सोयाबीन : १६०- १३०
शेंगदाणा : १९०- १६५
पाम : १४५- १३०
सरसू : २२०- १८०
०००००००००००००००००००००००००००