अमरावती : सुमारे २००० कोटींचे भागभांडवल असलेल्या जिल्हा बॅंकेची सार्वत्रिक निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीची नामांकन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. ६ सप्टेंबरनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ३.३९ कोटींच्या आर्थिक अपहाराचा मुद्दा प्रचाराचा हॉट टॉपिक राहणार आहे.
सहकार क्षेत्रातील सर्वाधिक चुरशीची ही निवडणूक राजकीय व्यक्तींच्या नेतृत्वात होत आहे. शेतकऱ्यांची ही बॅंक आपल्याकडे राहावी, यासाठी जंग जंग पछाडले जात आहे. त्यामुळेच प्रचारादरम्यान ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी देण्यात आलेल्या ३.३९ कोटींच्या दलालीचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहे. याप्रकरणात ज्यांच्या कार्यकाळात ती कोट्यवधीची रक्कम दिली गेली, ज्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला, त्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग राठोड यांना सक्तवसुली संचालनालय ‘ईडी’ने नोटीस पाठिवली आहे. त्यांना ७ सप्टेंबर रोजी ईडीच्या मुंबईस्थित कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत २८ ऑगस्ट रोजीच समन्स बजावण्यात आले आहे. त्यांच्याच कार्यकाळात ही आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप प्राधिकृत अधिकाऱ्याने शहर कोतवाली पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीतून केला आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय व्यवस्थेचे तत्कालीन प्रमुख म्हणून राठोड यांना ईडीच्या मुंबईस्थित कार्यालयाचे निमंत्रण आले आहे.
बॉक्स १
बॅंक व्यवस्थापन कोमात
ईडीची नोटीस राठोड यांना प्राप्त झाली असली, तरी त्या नोटिसीने बॅंकेचे व्यवस्थापन कोमात गेले आहे. बॅंकेचे विद्यमान प्रशासन तूर्तास पोलीस चौकशीला सामोरी जात आहे. बॅंकेचा पाच वर्षाचा लेखापरीीक्षण अहवाल देखील ईडीला पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीकडून आपली देखील चौकशी होऊ शकते, अशी भीती बॅंक व्यवस्थापनाला आहे.
यांच्याविरुद्ध झाले होते गुन्हे दाखल
मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी. राठोड, कर्मचारी निळकंठ बी. जगताप, सुधीर ब. चांदूरकर, राजेंद्र गणेशराव कडू, रोहिणी सुभाष चौधरी यांच्यासह शेअर व म्युच्युअल फंडचे दलाल अजितपाल हरिसिंग मोंगा, नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा मधुसूदन शर्मा, शिवकुमार गोकुलदास गट्टाणी व राजेंद्र मोतीलाल गांधी यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.