अमरावती : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या २७ जानेवारीपासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हाभरातील ८७९ शाळा सुरू करण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या ६५८,नगर परिषदेच्या २८,महापालिका ३१ आणि सासगी १६१ अशा एकूण ८७९ इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा आहेत. यामध्ये १ लाख ७७ हजार ७९१ विद्यार्थी जिल्हाभरात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारी सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सोमवारी शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. पत्रात सर्व शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका शाळा सुरू करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी बैठकीत शाळांची स्वच्छता, परिसर, वर्गखोल्याचे सॅनिटायझर, विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतिपत्र आदी सूचना केल्या आहेत. यानुसार शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना दिल्या आहेत, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन याबाबत योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
कोट
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळा, वर्गखोल्याची स्वच्छता, तसेच कोरोनाबाबत सर्व सूचनांचे केले जाईल. याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)