जितेंद्र दखने, अमरावती : जिल्हा परिषदेतील विषय शिक्षक व मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सोमवार, दि.४ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. याकरीता जिल्हाभरातून २२ शिक्षकापैकी आठ जणांना पदोन्नती देण्यात आली. एवढीच पदे जिल्हा परिषदेत सध्या रिक्त होती.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजिता मोहपात्रा, प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ज्या शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये शंकर सवाई, एकनाथ अंबुलकर, सुधा दारोकर, ललिता ढोके, उषा तिफने, अलका बोंडे, मंगला उमेकर, राम चौधरी यांचा समावेश आहे. यापूर्वी हे सर्व जण विषय शिक्षक व सहायक शिक्षक, तसेच मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या नव्या जबाबदारीनुसार ते आता विस्तार अधिकारी कामकाज सांभाळणार आहेत.
या पदोन्नती प्रक्रियेसाठी उपशिक्षणाधिकारी गजाला खान, विस्तार अधिकारी गंगाधर मोहने, सहायक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रवीण जिचकार, अर्चना मानकर, विजय मालोकर, हेमंत यावले, वरिष्ठ सहायक संजय खडसे, संदीप बिलबिले यांचे सहकार्य लाभले.