क्रीडाधिकारीपदाची जबाबदारी : खान वैद्यकीय रजेवरअमरावती : मागील दोन वर्षांपासून शिक्षणाधिकारीपदाचा आणि पर्यायाने महापालिकेच्या शिक्षण विभागाचा पुरता बोजवारा उडाला आहे. आता शिक्षणाधिकारी खान हे वैद्यकीय रजेवर गेल्याने सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी बी.झेड. खान हे ३ ते १५ एप्रिलपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र या वैद्यकीय रजेची कुठलीच माहिती महापालिकाकडे उपलब्ध नाही. शिक्षण खाते सांभाळणारे उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांच्याकडे खान यांच्या रजेबाबत कुठलाही अधिकृत कागद उपलब्ध नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या शिक्षणाधिकारी म्हणून आपल्याकडे असलेला अतिरिक्त चार्ज काढून घ्यावा, अशी विनंती आपण विभागीय उपसंचालकांना केल्याचे खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या पत्राची एक प्रत त्यांनी आयुक्तांचे नावे दिली आहे. मात्र त्यांच्या वैद्यकीय रजेबाबत आयुक्तांव्यतिरिक्त कुणालाही काहीही माहिती नाही. आपण शिक्षणाधिकारी म्हणून काम करण्यास अनुत्सुक असल्याचे खान यांनी अनौपचारिकपणे कबूल केले आहे.त्यामुळे वैद्यकीय रजा संपुष्टात आल्यानंतरही ते रुजू होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण विभागाची संगीतखुर्ची झाली आहे. वाकोडे यांच्या पदमुक्तेनंतर विजय गुल्हाने यांची कंत्राटी तत्त्वावर २१ जानेवारी २०१६ ला नियुक्ति करण्यात आली होती. मात्र सहा महिने संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. तातडीने डोंगरे यांच्या कडे प्रभार सोपविण्यात आला. डीटीएड कॉलेजमध्ये कार्यरत असलेले बी.झेड. खान यांच्याकडे राज्य शासनाने अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने शिक्षण विभागाचा गाडा रुळावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या अनिश्चिततेमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभाग ‘प्रभारी’ झाला आहे.
शिक्षणाधिकारीपदाची संगीतखुर्ची!
By admin | Published: April 07, 2017 12:20 AM