ऑनलाईन बैठक, विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अमरावती परिक्षेत्रातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना
अमरावती : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी बुधवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोेर मिणा यांनी पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांना ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नवीन सुधारणा कायदा २०१५ या विषयावर मार्गदर्शन केेले.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच सामाजिक बाहिष्कार विरोधी कायदा २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करून सामाजिक सलोखा राखण्यावर भर द्यावा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर सवर्णांद्वारे होणारे अत्याचार तसेच महिला अत्याचारांबाबत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेऊन त्यासंदर्भात तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांना अशा गुन्ह्यांच्या तपासात येणाऱ्या अडचणी तसेच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याबरोबर फिर्यादी किंवा पीडित व्यक्तीला तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रक्रिया याबाबतही यावेळी सांगण्यात आले. बैठकीला पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह परिक्षेत्रातील सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही ऑनलाईन उपस्थिती होती.