बेनोडा शहीद (अमरावती) - रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे. विजय मडावी (वय 55 वर्ष)असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्वचारोगाला कंटाळून त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्वचारोगने त्रस्त होते. धक्कादायक बाब म्हणजे शेतात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांचा विजय मडावी यांच्या त्वचेवर परिणाम झाला असावा, अशी चर्चा संपूर्ण परिसरात आहे. यालाच कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचंही बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी ते आलोडा रोडवरील प्रभाकर पाटील यांच्या शेताजवळ विजयचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विजयचे हात व पाय त्वचारोगामुळे सुजले होते. अनेक इलाज करुन ते थकले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेतात काम करताना त्यांना त्वचारोग उद्भवला. या आजारामुळे ते त्रासले होते. आजारापणालाच कंटाळून वडिलांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा जबाब त्यांचा मुलगा विपुल याने पोलिसांना दिला. पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, पीएसआय भरत लसंते यांचे मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.
यवतमाळमध्ये फवारणीचे १८ बळी, ‘त्या’ शेतक-यांच्या मृत्यूची चौकशी
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत सरकारने जाहीर केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’ वितरित करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल.विषबाधा प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालणार आहे. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री