लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी (जेईई) व वैद्यकीय (नीट) प्रवेश परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन मिळावे म्हणून शासनाने ८ जून २०२३ रोजी विशेष योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने दोन वर्षे मार्गदर्शन दिले जाणार होते. मात्र, प्रत्यक्षात ही योजना केवळ कागदावरच आहे. आदिवासी विकास विभागातील अधिकारी-कर्मचारीसुद्धा या योजनेविषयी अनभिज्ञ असून, ४८० आदिवासी विद्यार्थी योजनेच्या लाभापासून मुकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
आदिवासींच्या चळवळीत अग्रगण्य 'ट्रायबल फोरम' या संघटनेने सरकारला वारंवार पत्रव्यवहार करून नीट, जेईई पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी योजना तयार करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने ४ कोटी ८० लाख रुपयांची योजना तयार केली होती. मात्र, या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. आदिवासी विकास विभागांतर्गत प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील कोणत्याही एका शाळेमध्ये एक तुकडी वैद्यकीय व दुसरी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारी करण्यासाठी बनविण्यात येण्याची तरतूद आहे.
अपर आयुक्त कार्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड
- प्रत्येक अपर आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर दरवर्षी एक वैद्यकीय व एक अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश तयारी करवून घेण्यासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी अशा एकूण ६० विद्यार्थ्यांची निवड अकरावीसाठी केली जाणार होती.
- प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी, तर अकरावी व बारावी या दोन्ही वर्गासाठी एकूण ४८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, अमरावती, नाशिक, नागपूर व ठाणे या चारही एटीसी स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पत्रव्यवहार नाही.
मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रवेश परीक्षा
- विद्यार्थ्यांची निवड करताना प्रवेश परीक्षा घेतली जाणार होती. या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर तयार करण्यात येणार होती.
- राज्यात एकाच वेळी प्रवेश परीक्षा घेऊन अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश आणि दहावी परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश देण्यात येणार होता.
- गुणानुक्रमे अंतिम गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी नाशिक कार्यालयाच्या स्तरावरून प्रसिद्ध केली जाणार होती.
नामवंत खासगी शिक्षण संस्था देणार प्रशिक्षण
- नामवंत खासगी शिक्षण संस्थेच्या साहाय्याने दोन वर्षांसाठी नीट व जेईई प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम ४८० प्रशिक्षणार्थ्यांसाठी राबविण्यात येणार असून, ४ कोटी ८० लाख रुपयांची योजना आहे.
- प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष १ लाख रुपये फी खासगी संस्थेची असून, यामध्ये व्याख्यात्यांचे मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट सिरीज, आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी, आदी पुरविणे व इतर अनुषंगिक खर्चाचा तपशील आहे.
"मोफत प्रशिक्षण योजनेसाठी शासनाकडून अद्याप मार्गदर्शन प्राप्त नाही किंबहुना तसे काही आल्यास नामवंत खासगी संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई, नीटचे प्रशिक्षण दिले जाईल."- जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग अमरावती