अनिल कडू
फोटो पी १४ स्नेक
परतवाडा : परतवाड्यातील सर्पमित्रांनी वीस सापांना जीवदान दिले. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता आले नाही. परिणामी या कालावधीत प्लास्टिक बरणीत बंद केलेल्या प्रजातीच्या सर्पिणीने चक्क २५ अंडी दिली आहेत. प्रशासनाने ओळखपत्र व वाहनात इंधन भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी साप पकडून त्याचे व नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या सर्पमित्रांनी केली आहे.
परतवाडा येथील इन्व्हायर्नमेंटल लाईफ सोसायटीचे सदस्य असलेल्या सर्पमित्रांनी ८, ९ आणि १० मे या तीन दिवसांत लोकांच्या विनंतीवरून त्यांच्या गावात पोहोचून २० साप पकडले. नायगाव बोर्डी येथे रात्री २ वाजता, तर धोतरखेडा येथे रात्री १२ वाजता पोहोचून विषारी कोब्रा नागांना पकडण्यात आले. यासोबतच तीन दिवसांत वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप त्यांनी लोकवस्तीतून ताब्यात घेतले. यात जयंत तायडे, सागर पेंढारकर, संतोष काळे, मानसी कडू, ऋतुजा खैरे, विवेकानंद राऊत या सर्पमित्रांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
'दिवड' सापालाही त्यांनी प्लास्टिकच्या बरणीत घेतले. या मादी सापाने बरणीतच २५ अंडी दिली. सर्प मित्राने पकडलेल्या सापाने बरणीत अंडी देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना ठरली आहे, असे मत सर्प मित्र जयंत तायडे यांनी व्यक्त केले.
लॉकडाउनचा फटका
लॉकडाऊनचा फटका सर्पमित्रांना आणि बंदिस्त सापांनाही बसत आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे सर्पमित्रांना नियोजित ठिकानी पोहोचायला अडचणी येत आहेत. पेट्रोल पंपवर त्यांना पेट्रोलही मिळत नाही. पकडलेल्या सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडायलाही विलंब झाला.
प्रशासनाचे दुर्लक्ष
आपत्कालीन स्थितीत वेळ, काळ न बघता लोकांच्या हाकेवर मदतीला धावून जाणाऱ्या सर्पमित्रांच्या कार्याची दखल घेऊन प्रशासनाने त्यांना ओळखपत्र वितरित करणे गरजेचे आहे. सर्पमित्रांनी परतवाडा वनविभागाकडे त्यासाठी अर्ज केला. प्रशासकीय यंत्रणेकडून कुठल्याही हालचाली नाहीत.
अखेर सापांना सोडले
सर्पमित्रांनी पकडलेल्या सापांना अखेर वनविभागाच्या मदतीने जंगलात दूरवर सोडण्यात आले. दिवड सापाची अंडी त्याच परिसरात सर्पमित्रांनी सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत. यात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक नितीन अहिरराव यांचे सहकार्य मिळाले.