फोटो पी २२ महादेव खोरी
अमरावती : स्थानिक वरुणनगर येथील प्रणय सातनुरकर (२२) याच्या निर्घृण हत्याप्रकरणी तब्बल आठ मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात आले. घटनेच्या अवघ्या सहा ते सात तासांत फ्रेजरपुरा पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली. एक आरोपी अद्याप पसार आहे. अटकेतील आरोपींना गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्ववैमनस्य व जुन्या न्यायालयीन प्रकरणातून प्रणय मधुकर सातनुरकर या २२ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. २१ जुलै रोजी दुपारी ५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महादेवखोरी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मोठा जमाव फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात जमा झाला होता. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या नेतृत्वात फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले. यंत्रणा वेगाने कामाला लागली अन् रात्रीच्या १२ च्या ठोक्याच्या आत आठ आरोपी गजाआड करण्यात आले.
असे आहेत आरोपी
आरोपींमध्ये ब्रिजेश ऊर्फ विजय मूलचंद गुप्ता (२९), मंगेश ऊर्फ मोहन बाबाराव पावडे (२९), गौरव नंदुजी गवळी (२६), विशाल विलास परचाके (२६), अक्षय महादेव भुरखंडे (२५), पवन राजू कैथवास (२०), रूपेश विजय टांगळे (२५, सर्व रा. महादेवखोरी) व अनिकेत ऊर्फ भटाऱ्या अनिल खिराळे (२०, रा. वृंदावन कॉलनी, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अनिकेत खिराळे वगळता अन्य सात आरोपींना दारव्हा तालुक्यातील गणेशपूर येथून अटक करण्यात आली. भटाऱ्याला अमरावतीहून अटक करण्यात आली. ऋतिक तायडे नामक आरोपी पसार आहे.
यातून घडले हत्याकांड
सन २०१७ मध्ये प्रणय सातनुरकर याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केस मागे घेतो, पैसे दे, अशी मागणी तक्रारकर्त्यांकडून प्रणयकडे करण्यात आली. सन २०२० मध्ये ब्रिजेश मिश्रा व अन्य एकाने प्रणय सातनुरकर याच्यावर चाकुने हल्ला केला होता. त्यातून या नवतरुणांमधील खुन्नस वाढत गेली. त्यातून बुधवारी आरोपींनी अन्य काही सोबत्यांकडे चल, ट्रीपला जाऊ, अशी बतावणी केली. पुढे आठ ते नऊ आरोपींनी एकत्र येऊन प्रणयचा बळी घेतला.
कोट
महादेवखोरीतील हत्याप्रकरणी सात आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपूर येथून अटक केली. अन्य एक अमरावतीत सापडला. न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, फ्रेजरपुरा