अमरावती : ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही वीजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मंगळवरी अमरावती शहरातील वडाळी, कॉँग्रेसनगर भागात तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान कॉँग्रेस नगर येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात तोडफोड करत संताप व्यक्त केला. जवळपास शेकडो नागरिकांचा जमाव हा उपकेंद्रावर धडकला होता.
शहरात महावितरणचे परिमंडळ कार्यालय आहे. परंतु गेल्या दिवसांपासून शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे जिल्ह्यातील उन्हाचा चढता पारा लक्षात घेता, नागरिकांचे चांगलेच हाल होत आहे. मंगळवारी दुपारी आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा हा खंडित झाला होता.
महावितरणच्या कॉँग्रेस नगरातील उपकेंद्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागामध्ये सायंकाळी ५ वाजतापासून विद्युत पुरवठा खंडित झाला. परंतु रात्री १० वाजेपर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हाता. त्यामुळे वडाळी, गजानन नगर, चपराशी पुरा, सुंदरलाला चौक, राहुल नगर, आशियाना क्लब, वीटभट्टी परिसर, त्रिवेणी कॉलनी, कॅम्प परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयावर धडक दिली. परंतु याठीकाणी नागरिकांना कोणीही आढळून न आल्याने संतप्त जमावाने उपकेंद्रात ठेवण्यात आलेल्या मिटरची फेकफाक करत तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला शांत करत कार्यालय परिसरातून हाकलून लावले. या घटनेनंतर बुधवारी रात्री दीड वजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला.