अमरावती : कोरोनातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अनेकांना पोस्ट कोविड आजाराचा त्रास होत असल्याचे दिसून येते, यापैकी आठ जण अद्यापही शासकीय व खासगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग माघारला असल्याने कोरोना रुग्णालयात सध्या शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
यापैकी बहुतेकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे तर काहींची ऑक्सिजन लेव्हल अद्यापही सामान्य आलेली नाही. याशिवाय काही रुग्ण म्युकरमायकोसिस आजारावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा प्रकार कमी प्रमाणात असला तरी दुसऱ्या लाटेत मात्र पोस्ट कोविडच्या रुग्णात वाढ झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयात असे रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संसर्गात ज्यांचा स्कोर १६ ते १९ होता अशा रुग्णांना फुफ्फुसाचा त्रास वाढलेला आहे. काहींना ‘फायब्रोसिस’ या आजाराचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात व येथील टीबी हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड रुग्णांसाठी वाॅर्ड तयार करण्यात आला आहे. याशिवाय काही नॉनकोविड रुग्णालयातदेखील पोस्ट कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
कोरोनातून बरे झाल्यावर ज्येष्ठांना त्रास
येथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल कोरोनाच्या गंभीर रुग्णांपैकी १५ ते २० टक्के रुग्णांना फायब्रोसिस, म्युकरमायकोसिस यासह अन्य व्याधींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. श्वसनाच्या विकारात ऑक्सिजन पातळी सामान्य नाही, याशिवाय उभे राहताना त्रास होणे, आदी त्रास रुग्णांना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स
पोस्ट कोविडचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठांना
कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर अन्य व्याधीच्या सर्वाधिक तक्रारी ज्येष्ठ नागरिकांना उद्भवत आहेत. कोरोना हा श्वसन यंत्रणेवर अटॅक करणारा आजार आहे. याचा संसर्ग फुफ्फुसात गेल्याने आता त्रास जाणवत आहे. याशिवाय जिना चढताना त्रास होणे. थोडे जरी काम केले की थकवा येणे, आदी त्रास या रुग्णांना होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
ही काळजी महत्त्वाची
*) कोरोनातून बरे झाल्यावर लगेच अंगमेहनतीची कामे करणे टाळावे. सुरुवातीचे किमान १५ दिवस तरी विश्रांती घ्यावी व हळहळू कामे करावीत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*) डॉक्टरांच्या सल्ल्याने पौष्टिक आहार घ्यावा, याशिवाय प्रोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. हिरवा भाजीपाला, मोड आलेल्या कडधान्याचा आहारात समावेश असावा.
*) श्वसनाचा व्यायाम करावा, त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, याशिवाय सहव्याधी आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.
पाॅईंटर
कोरोनाचे एकूण रुग्ण : ९६,३७२
बरे झालेले रुग्ण : ९४,६३५
कोरोनाचे एकूण बळी : १,५५९
सध्या उपचार सुरू : १७८
कोट
पोस्ट कोविड रुग्णांसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास, थकवा, दम लागणे आदी शिवाय अन्य समस्या उद्भवतात, या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा, पौष्टिक आहार घ्यावा.
डॉ. श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्य चिकित्सक