अमरावती - मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर केवळ दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी जिल्ह्यात ९०, तर राज्यात ८ हजार ६८५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा भागात वीज जोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने शेतकऱ्यांना वारंवार विचारणा करून मार्गदर्शन पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत असून, क्षेत्रीय स्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे. २९ जानेवारीपर्यंत राज्यातील सुमारे ८ हजार ६८५ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.