अमरावती : अमरावती जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेना गटाचा उमेदवार राहील, असा दावा माजी आमदार तथा शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेतून केला.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षबांधणीसाठी अमरावती दौऱ्यावर आले असताना अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिंदे शिवसेनेचा दावा असून, उमेदवार कोण असेल, हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही नेतेमंडळी ठरवतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्य सरकार अस्थिर असल्याबाबत विचारणा केली असता सरकारमध्ये २१५ आमदार असून, कोणतीही अस्थिरता नाही. काही विरोधक नेते फक्त प्रसार माध्यमांत वाईट देण्यापुरते शिल्लक राहिले, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक नेते, पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. येत्या २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे केंद्रात सरकार राहील, असा विश्वास त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पडोळे, गोपाल अरबट, संतोष बद्रे आदी उपस्थित होते.
आमदार-खासदार राणा दाम्पत्याशी हातमिळवणी नाही
खासदार नवनीत राणा अथवा आमदार रवी राणा यांच्याशी कोणतीही हातमिळवणी नाही, ती असती तर अमरावती लोकसभा जागेवर शिवसेनेेने दावा केला नसता, असेही अभिजित अडसूळ म्हणाले. खा. नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, ती लढाई अद्याप थांबलेली नाही. आम्हीसुद्धा निकालाची प्रतीक्षा करत आहोत.
ईडी किंवा सीबीआय चौकशीमुळे राज्यात नवे सरकार स्थापन झाले, या केवळ चर्चा आहेत. आमदारांना आजही नोटीस येतच आहे. हे सरकार वेगळ्या भावनेतून निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या एककल्ली कारभारामुळे शिवसेनेचे आमदार बाहेर पडले आहेत, असे अडसूळ यांनी सांगितले.
आता भाजप अन् शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
खासदार नवनीत राणा या झेंडा आणि अजेंडा राबविण्याचे काम करीत आहे. आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीला अजित पवार आले आहेत.‘ ट्रीपल इंजिनच’ सरकार कार्यरत आहे. शिंदे शिवसेनेने अमरावती लोकसभा जागेवर दावा केल्याने हा दावा कितपत खरा ठरेल. शिंदे, फडणवीस हे खासदार नवनीत राणा विरूद्ध उमेदवार देतील का? याकडे अनेकांचा नजरा लागल्या आहेत.