अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व भाजपला मान्य आहे. त्यामुळे २०२४ मधील निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील व भाजपच्या संमतीने शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी शुक्रवारी येथे केला.
अमरावती विभागातील खरीप हंगाम नियोजन सभेसाठी ना. सत्तार येथे आले होते. बैठकीपश्चात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाच्या वादासंदर्भात ते म्हणाले, आम्ही २५ वर्षांपासून मित्र आहोत. पक्षातही सोबतच होतो. मुख्यमंत्री पदासंदर्भात मी त्यांच्या नावाबाबत बोललेलोच नाही तर, राज्याचा मुख्यमंत्री मराठा चेहरा असावा, असे मी बोललो आहे. एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे देखील मराठा चेहरा आहेत. माझे हृदय चिरल्यास त्यामध्ये माझे मित्र म्हणून राधाकृष्ण विखे पाटील दिसतील, त्यांच्यात व माझ्यात असलेल्या मैत्रीसंदर्भात आपण असे व्यक्तव्य केले होते, असे. ना. सत्तार म्हणाले.त्यांनीच सूचविली जागा, आता करतात विरोध
बारसू येथील प्रकल्पासंदर्भात सध्या जी स्थिती आहे. त्यावर बोलतांना ना. सत्तार उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले. आमचे यापूर्वीचे नेते असणाऱ्यांनीच त्यावेळी जागा सूचविली होती व आता हे सरकार अंंमलबजावणी करीत असतांना त्यांच्याद्वारा विरोध होत आहे. विरोधासाठी विरोध केल्या जात आहे, विकासाच्या कामात राजकारण नको, असे ना. सत्तार म्हणाले.