अमरावती : जिल्ह्यातील ५४३ सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहायक निबंधकांची बैठक जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी बोलाविली व सोसायटींच्या मतदार याद्या सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्या प्राप्त होतील त्यानुसार निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. किमान सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
दहा बाजार समित्यांच्या निवडणुकीपूर्वी नियत झालेल्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहेत. प्राधिकरणाद्वारा यासंदर्भात सर्व जिल्हा उपनिबंधक कार्यालयास तसे २६ डिसेंबरच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व पात्र सोसायटींची निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पूर्वी घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी सर्व सहायक निबंधकांची बैठक बोलावली व यामध्ये निवडणुकीस पात्र सोसायटींच्या मतदार याद्या लवकर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. ज्या सोसायटी मतदार यादी व निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे डीडीआर दीपक लव्हेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निवडणूक अधिकाऱ्याची होणार नियुक्ती
मतदारयादी प्राप्त झालेल्या सोसायटींच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पात्र, सोसायटींच्या निवडणुकीची प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापले असून, तालुकास्तरावर सहायक निबंधक कार्यालयाच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत.