नगराध्यक्ष कार्यमुक्त : प्रशासकीय राजवट सुरूअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षपदांची मुदतवाढ व कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शनिवार ५ जुलै रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांचा प्रभार प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी सांभाळला आहे. मात्र, महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम अन्वये रिक्त पदांसाठी २५ दिवसांच्या आत निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या नऊही नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष निवडीसाठी ३० जुलै २०१४ च्या आत विशेष सभा बोलवावी लागणार आहे. जिल्ह्यातील चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव (सुर्जी), वरूड, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, मोर्शी, शेंदूरजनाघाट, दर्यापूर, धामणगाव या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना शासनाने दिलेली मुदतवाढ ३ जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द केली. ही मुदतवाढ ५ जुलै रोजी संपुष्टात आल्याने या नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात आले. ‘अ’ वर्ग नगरपरिषदांचा प्रभार उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे व ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदांचा प्रभार तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. प्रशासकीय राजवट असली तरी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमान्वये रिक्त जागांसाठी २५ दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे उपाध्यक्ष वैभव लेंधे यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या मुदतवाढीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून सर्व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी स्थगनादेश मिळविला आहे. हा मुद्दा आता शासनाने रद्दबातल केला आहे. त्यामुळे या याचिकेच्या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
३० जुलैपूर्वी होणार नगराध्यक्षांची निवडणूक
By admin | Published: July 05, 2014 11:18 PM