अमरावती : सहकारात प्रतिष्ठेची असलेल्या १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी प्रसिद्ध केल्या. ३० एप्रिलच्या आत बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत नागपूर खंडपीठाने यापूर्वीच आदेश दिले आहे. त्यामुळे सहकार विभागाद्वारा कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे.
जिल्ह्यात अमरावती-भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२२ या अहर्ता दिनांकावर करण्यात आली, प्रारुप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यात, याच अनुषंगाने अमरावती बाजार समितीमधील अपात्र ४०० वर मतदारांसाठी प्रकरण न्यायालयातही दाखल झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये मतदार यादी प्रसिद्ध केली. व न्यायालयाने दिलेल्या कालावधीला केवळ ४० दिवस बाकी असल्याने या आठवड्यात जिल्ह्यातील १२ ही बाजार समित्यांचा कार्यक्रम जाहीर केल्या जाण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाने सांगितले.